आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित मुलीच्या शाळेतील गैरहजेरीबाबत उत्सुकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  कोपर्डी येथील बलात्कार करुन खून करण्यात आलेली पीडित मुलगी शाळेत दोन दिवस गैरहजर असल्याची महत्त्वपूर्ण बाब साक्षीमध्ये समोर आली. पीडितेचा खून झाल्याच्या आदल्या दिवशी ती शाळेत आली नव्हती, असे तिच्या वर्गशिक्षकांनी नमूद केले. या गैरहजेरीच्या मुद्द्यामुळे या खटल्यातील उत्सुकता वाढली आहे. वर्गशिक्षकांसह आणखी एका युवकाची साक्ष सोमवारी नोंदवण्यात आली. तत्पूर्वी कुळधरण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांची उलटतपासणी पूर्ण झाली. 
 
कोपर्डी खटल्याची सुनावणी सोमवारपासून जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर पुन्हा सुरु झाली. महत्त्वाच्या नोंदवह्यांअभावी कुळधरण आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची तहकूब झालेली उलटतपासणीही सोमवारी पूर्ण झाली. वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, एमएलसी मृत्यू रजिस्टर न्यायालयात सादर केले. त्यापैकी काही नोंदींवर आरोपीचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी गंभीर आक्षेप नोंदवले. 

वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी न्यायालयात सादर केलेल्या नांेदवह्यांमध्ये खाडाखोड केली आहे, असा युक्तिवाद दुसऱ्या क्रमांकाच्या आरोपीचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी केला. केसपेपर प्रत्यक्ष नोंदवहीत असलेल्या अनुक्रमात विसंगती असल्याचा नवा मुद्दाही त्यांनी समोर अाणला. नोंदवह्या शासनाने विहित केलेल्या नमुन्यात नसल्याचे एमएलसी रजिस्टरच्या पानांवर रबरी शिके मारलेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

दवाखान्यातील एमएलसी रजिस्टर नवे कोरे असून इतर नोंदवह्यांच्या विश्वासार्हतेवरही अॅड. खाेपडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडितेला दवाखान्यात आणल्यानंतर या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी वरिष्ठांना दिली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अॅड. खाेपडे यांच्यासह तिसऱ्या क्रमांकाच्या आरोपीच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी सोनवणे यांच्या साक्षीवर आक्षेप नोंदवत ती खोटी असल्याचा युक्तिवाद केला. 

केसपेपर प्रत्यक्षातील नोंदवह्यांमधील विसंगतीविषयी आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर फेरतपासणी करु द्यावी, असा अर्ज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात दिला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने तशी परवानगी अॅड. निकम यांना दिली. या मुद्द्यांवर खुलासा करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदवह्या इतर कर्मचारी भरत असल्याचे न्यायालयात सांगितले. 

भैलुमेला ओळखले 
घटनेच्या दिवशी फिर्यादीबरोबर असलेल्या मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला पाहिलेल्या एका युवकाची साक्ष झाली. त्यानेही १३ जुलैला सायंकाळी घडलेला घटनाक्रम न्यायालयात कथन केला. मुख्य आरोपीला पळून जाताना पाहिल्याचे, तसेच त्याचा पाठलाग केल्याचेही त्याने सांगितले. न्यायालयात उपस्थित असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी जप्त केलेले त्याचे कपडेही त्याने ओळखले. 

ती अभ्यासातही हुशार 
पीडित मुलीच्या वर्गशिक्षकांची साक्ष उलटतपासणीही पूर्ण झाली. पीडित मुलगी अभ्यासात हुशार होती, तसेच नृत्य खो-खोमध्येही पारंगत होती, असे त्यांनी सांगितले. १२ १३ जुलै (अत्याचार खून झाला, तो दिवस) २०१६ ला पीडित मुलगी शाळेत न आल्यामुळे तिची गैरहजेरी लावल्याचे ते म्हणाले. नंतर प्राचार्यांच्या सांगण्यानुसार तिच्या नावापुढे मृत्यूची नोंद केल्याचे त्यांनी नमूद केले. 

आज होणार उलगडा 
पीडित मुलगी दोन दिवस शाळेत का आली नव्हती, याचे गूढ मंगळवारी उलगडेल, असे विशेष सरकारी वकील निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पीडितेच्या शाळेतील गैरहजेरीचे नेमके कारण मंगळवारी पुराव्यानिशी न्यायालयात स्पष्ट करु, असेही ते म्हणाले. मंगळवारी या खटल्यात चौघांच्या साक्षी नोंदवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...