आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी: आरोपींनी आधी केला होता विनयभंग, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवणार खटला - Divya Marathi
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवणार खटला
नगर - कोपर्डी अत्याचारप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर बुधवारी आरोपींवर दोषनिश्चिती करण्याबाबत सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आरोपींनी १३ जुलैला अल्पवयीन मुलीवर िनर्घृण अत्यावर करून खून केला होता. त्याआधी चार दिवस तिची छेड काढून विनयभंग केला होता, अशी धक्कादायक बाब युक्तिवादात समोर आली.
आरोपींनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी सबळ पुरावे उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यावर दोषनिश्चिती करण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. गुरुवारी एका आरोपीच्या वतीने करण्यात आलेल्या दोषातून मुक्त करण्याच्या व जामीन अर्जावर व त्यानंतर दोषनिश्चितीची सुनावणी होणार आहे.

मंगळवारपासून कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. बुधवारी सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष गोरक्ष भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता दुसऱ्या दिवशीही न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. अॅड. निकम यांनी युक्तिवादात सांगितले की, सरकारी पक्षातर्फे ७० साक्षीदार तपासणार आहे.
काय झाले पहिल्या दिवशी....
पहिल्या दिवशी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर तिन्ही आरोपींना हजर करण्यात आले. मुख्य आरोपीसह आणखी एका आरोपीच्या मागणीनुसार विधी सेवा प्राधिकरण समितीने निवृत्त सरकारी वकील योहान मकासरे यांची आरोपींच्या बाजूने खटला लढवण्यासाठी नियुक्ती केली.

तिसऱ्या आरोपीने आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्याविरोधात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बुधवारी बाजू मांडणार आहेत. पोलिसांनी तीनशे पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुुक्ती केली आहे. येरवडा कारागृहात असलेला मुख्य आरोपी जितेंद्रसह आरोपी संतोष गोरक्ष भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांना पोलिसांनी दुपारी न्यायालयात हजर केले. जितेंद्र व भवाळ याने अाम्हाला वकील मिळावा, असा विनंती अर्ज केला. विधी सेवा प्राधिकरण समितीने निवृत्त सरकारी वकील मकासरे यांची नियुक्ती केली. तिसरा आरोपी भैलुमेने वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होत आहे.

मी निर्दोष, मला खटल्यातून मुक्त करा....
आरोपी संतोष भवाळ आणि जितेंद्र शिंदे या दोन्ही संशयितांनी सरकारी वकिलांची मागणी केली आहे. तसेच तिसरा आरोपी‍ नितीन भैलुमे याने निर्दोष असल्याचे कोर्टात सांगितले. तसेच खटल्यातून आपल्याला मुक्त करण्याची मागणी देखील केली. भैलुमे याने जामीन मिळावा म्हणून वकिलामार्फत अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी होणार्‍या सुनावणीत पुरावा आणि साक्षीदाराच्या साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

एकूण 70 साक्षीदार
पोलिस निरीक्षक शशिराज पोटोळे यांच्या पथकाने हा तपास केला. परिस्थितीजन्य, सबळ पुरावे व प्रत्यक्षदर्शी असे एकूण 70 साक्षीदार यात आहेत. एकूण 39 प्रकारचा मुद्देमाल पकडल्याचे नमूद आहे.

आरोपपत्रात जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरक्ष भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम 302, अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी कलम 376(अ), कलम 4 व 6, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम आरोपींवर लावण्यात आले आहे. यात आणखी आरोपी आढळल्यास 173 (8) प्रमाणे त्यांचे जबाब घेऊन त्यांना आरोपी करण्यात येणार आहे.

असा घडला गुन्हा
या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने 13 जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोपर्डीतील शालेय मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. त्यास 15 जुलै रोजी श्रीगोंदे येथून अटक करण्यात आली. या घटनेत एकच आरोपी असावा, असा पोलिसांचा प्रारंभी कयास होता. त्यामुळे शिंदे याचे साथीदार संतोष व नितीन दुर्लक्षित राहिले होते.

आरोपींना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही
सरकारने उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील दिले आहेत. आम्ही या नराधमांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही. काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी या प्रकरणी आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीत बोलताना केला.

ग्रामस्थांमुळे आणखी दोघे सापडले...
या प्रकरणात शिंदेला अटक झाल्यानंतर तो एकटाच नव्हे, एकूण तीन आरोपी आहेत, असा ग्रामस्थांचा दावा होता. इतर दोघांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी दबाव वाढवल्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी नितीन भैलुमे यास 16 जुलै, तर तिसरा आरोपी संतोष मवाळ यास 17 जुलैला अटक केली. दरम्यानच्या कालावधीत या प्रकरणाला जातीय रंग येऊ लागल्याने गांभीर्य वाढले. राज्यातील प्रमुख नेत्यांनी कोपर्डीला भेट देऊन वातावरणत तापले. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्यांच्यावर अंडी व चपला फेकण्यात आल्या. त्यामुळे आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला. आरोपपत्र दाखल करण्यास होत असलेल्या विलंबामुळे मराठा समाज राज्यभर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी अत्याचाराचा घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...