आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन भैलुमे यास दोषमुक्त करण्यास नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार खूनप्रकरणातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या वतीने करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी गुरुवारी फेटाळून लावला. भैलुमेच्या जामीन अर्जावर २७ ऑक्टोबरला सरकार पक्षाचे म्हणणे सादर होईल. नोव्हेंबरला या अर्जावर निर्णय होईल. दरम्यान, भैलुमेच्या दोषमुक्तीसाठी त्याचे वकील औरंगाबाद खंडपीठात अपील करणार असून त्यासाठीही २७ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भैलुमेच्या दोषमुक्तीवरून दोन्ही पक्षांच्या वतीने सुमारे दीड तास युक्तिवाद चालला.
१८ ऑक्टोबरपासून जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे संतोष भवाळ यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणने अॅड. योहान मकासरे यांची नेमणूक केली. त्याच दिवशी तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने दोषमुक्ती जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर काम पहात आहेत. सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोप निश्चितीसाठी युक्तिवाद केला, तसेच दोष निश्चितीचा मसुदाही सादर केला.

मुख्य आरोपी शिंदे याच्यासह त्याचे साथीदार भवाळ भैलुमे या तिन्ही आरोपींवर कट रचून खून, बलात्कार पॉस्कोचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्याची विनंती निकम यांनी केली होती. गुरुवारी सकाळी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपी भैलुमेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे मांडले. तत्पूर्वी कामकाज सुरू होताच विशेष सरकारी वकील निकम यांनी न्यायालयात मोबाइल वापराला मज्जाव करण्याची विनंती केली. मोबाइलद्वारे सुनावणीचे ध्वनिमुद्रण करून ती व्हायरल होऊ नये, यासाठी ही मागणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.

तो तेथे नव्हताच...
भैलु मेयाला दोषमुक्त करावे, यासाठी सादर केलेल्या अर्जावर बाजू मांडताना त्याचे वकील अॅड. आहेर यांनी पोलिसांच्या तपासावर आक्षेप नोंदवले. पोलिसांनी त्याला घटनेनंतर तिसऱ्या दिवशी अटक केली. भैलुमे हा शास्त्र शाखेची पदवी घेतलेला सुशिक्षित युवक असून तो शैक्षणिक कागदपत्र घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोपर्डीत आला होता. गुन्हा घडण्याच्या वेळी त्याला एकाही प्रत्यक्षदर्शीने पाहिलेले नाही. अधिकारी होण्यासाठी तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तो गरीब अनुसूचित जातीचा असल्यामुळेच त्याला गुन्ह्यात गोवण्यात आले, असेही त्यांनी ठासून सांगितले.

गुन्हेगाराला जात नसते
पोलिसांनी एखाद्या आरोपाचा उल्लेख केला नाही, म्हणजे तो आरोप ठेवता येणार नाही असे अजिबात नाही. सरकारी वकील पोलिसांचे प्रवक्ते नसतात, तर ते न्यायदानात मदत करतात, असे विशेष सरकारी वकील निकम यांनी ठासून सांगितले. हा संवेदनशील खटला असून या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी भान ठेवून बोलावे. भावविवश होता न्यायालयात पुरावे सादर करावेत. समाजात तेढ वाढेल असे वक्तव्य करण्याची खबरदारी त्यांनी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म किंवा पंथ नसतो याचे भान ठेवावे, असेही अॅड. निकम म्हणाले.

साक्षीदार विश्वासार्ह नाहीत
आरोपींनी कट रचल्याचा आरोप पोलिसांच्या दोषारोपपत्रात नसल्यामुळे त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यास अॅड. आहेर यांनी आक्षेप घेतला. खटल्यातील साक्षीपुराव्यांमध्ये उणिवा दोष असून त्या विश्वासार्ह नाहीत, असेही ते म्हणाले. भवाळ भैलुमे हे घटनास्थळी दोन-तीन दिवस टेहळणी करत हाेते, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे. मात्र, निश्चित वेळेचा उल्लेख त्यात नाही. शिवाय भैलुमे याचा बलात्काराच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नाही, त्याने बलात्कारही केलेला नाही. त्यामुळे त्याला दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद अॅड. आहेर यांनी केला.

ती मुलगी दहशतीखाली
अॅड.निकम यांनी बाजू मांडताना मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने मुलीवर अत्याचार करून खून करण्यापूर्वी चार दिवस अगोदरही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा पुनरूच्चार केला. आरोपी भवाळ भैलुमे यांनी तिला बदला घेण्याची धमकी दिली होती. हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितला आहे. आरोपींच्या दहशतीमुळे मुलगी दोन दिवस शाळेत गेली नव्हती. नंतरच्या दिवशी आरोपींनी कट रचून तिला एकटे गाठले. मुख्य आरोपी शिंदे याने तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. इतर आरोपींचीही त्याला साथ होती, असे अॅड. निकम यांनी सांगितले.

मगतक्रार का नाही?
पीडितमुलीवर आरोपींनी चार दिवसांपूर्वी अत्याचार केल्याची कथा पोलिसांनीच रचली, असा आरोप अॅड. आहेर यांनी केला. जर विनयभंगाचा प्रकार घडला, तर पोलिसांत किंवा गावातील तंटामुक्ती समितीकडे तक्रार का केली नाही? पीडित मुलगी दोन दिवस शाळेत का आली नाही? याबाबत शाळेतील एकाही शिक्षकाचा जबाबाचा उल्लेख दोषारोपपत्रात का नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यामुळे चार दिवसांपूर्वी आरोपींनी अतिप्रसंग केल्याचा प्रकार ही पोलिसांनी तयार केलेली कहाणी असून तसे परिस्थितीजन्य पुरावे नसल्याने भैलुमे याला दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

गुणवत्तेवर आक्षेप नको
आरोप निश्चितीसाठी प्राथमिक पुराव्यांची तपासणी होते. त्यामुळे तपासात गोळा केलेल्या पुराव्यांच्या गुणवत्तेवर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेऊ नये, पुराव्यांची चिरफाड प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीत करावी, अशी अपेक्षा अॅड. निकम यांनी व्यक्त केली. चार दिवस अगोदर पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अाहे. त्यावेळी मुख्य आरोपी शिंदे याचे साथीदार भवाळ भैलुमे यांनी तिला “”आपण नंतर काम दाखवू’’, अशी धमकी दिली. यातील “काम दाखवू’ हा गर्भित इशाऱा म्हणजेच १३ जुलैला झालेला प्रकार होता, असे निकम यांनी ठासून सांगितले.

तर्कशास्त्राचा घेतला आधार
१३जुलैला मुख्य आरोपी शिंदे याने मुलीवर बलात्कार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला. घटनेनंतर तिन्ही आरोपींना फिर्यादी साक्षीदारांनी त्या परिसरात पाहिले. भवाळ भैलुमे यांनी त्यांची मोटारसायकल पायवाटेने नेऊन आडबाजूला लावली. याअर्थी त्यांचा हेतू चांगला नसल्याचे स्पष्ट आहे. फिर्यादीनुसार साडेसातनंतर गुन्हा घडला. त्यामुळे आरोपींच्या टेहळणीची वेळ त्यानंतरची असल्याचे स्पष्ट होते, असे अॅड. निकम म्हणाले. तर्कशास्त्राच्या प्रमेयाचा आधार घेत भवाळ भैलुमे या आरोपींनी अत्याचार केला नसला, तरी त्यांचा तसा करण्याचा हेतू असल्याची शक्यता असल्याचे नमूद केले.

आता जामिनावर निर्णय
विशेष सरकारी वकील निकम आरोपीचे वकील आहेर यांनी एकापाठोपाठ केलेल्या सव्वा तासाच्या युक्तिवादानंतर अडीच वाजता सुनावणी स्थगित करण्यात आली. सव्वातीन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. आरोपी भैलुमेने केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यावर आरोपींच्या वकिलांनी खंडपीठात अपील करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी न्यायालयाने २७ आॅक्टोबरपर्यंत मुदत िदली. त्याच दिवशी भैलुमेच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले जाईल, तर नोव्हेंबरला जामीन अर्जावर सुनावणी होईल, असे जिल्हा सत्र न्यायाधीश केवले यांनी सांगितले.

पोलिसांवर प्रचंड ताण
सुरक्षा अतिरिक्त कैद्यांच्या कारणामुळे नगरच्या सबजेल कारागृहाने तिन्ही आरोपींना तात्पुरते ठेवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आरोपींना सलग तीन दिवस थेट पुण्याच्या येरवडा कारागृहातून आणावे लागले. यापूर्वी आरोपींवर हल्ल्याचे प्रयत्न झाले असल्यामुळे पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. न्यायालयात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण पडत आहे.

नंतर घेतले सावरून
आरोपी भैलुमे याचे वकील अॅड. आहेर यांनी युक्तिवाद करताना कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात उमटलेल्या घटनांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायालयाने त्यांना दोनदा दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद सुरू असून कायदेशीर मुद्यांवरच बोलण्याची सूचना केली. त्यावेळी काही मिनिटांकरिता त्यांच्या युक्तिवादात संभ्रम निर्माण झाल्याचे जाणवले. नंतर लगेचच त्यांनी सावरुन घेत इतर मुद्यांच्या आधारे आपली बाजू प्रखरपणे न्यायालयात मांडली. तुलनेने अॅड. उज्ज्वल निकम मात्र आत्मविश्वासाने युक्तिवाद करत होते.

कायदेशीर बोला
आरोपीभैलुमेच्या वतीने बाजू मांडताना अॅड. आहेर यांनी कोपर्डी प्रकरणामुळे समाजात उमटलेल्या प्रतिक्रियांवर बोलायला सुरुवात केली. त्यावर ही बाब दोषारोपपत्रात आहे का, अशी विचारणा न्यायालयाने त्यांना केली. त्यांनी नकार देताच मग ती बाब टाळण्यास न्यायालयाने त्यांना सांगितले. पुन्हा युक्तिवाद करण्याच्या ओघात अॅड. आहेर यांनी कोपर्डी प्रकरणानंतरच्या सामाजिक घडामोडींवर भाष्य करण्यास सुरुवात केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना दोषारोपपत्रातील कायदेशीर मुद्यांवरच बोलण्याची आठवण करुन दिली.
बातम्या आणखी आहेत...