आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाच्या सर्व साक्षी पूर्ण; अॅड. निकम यांची माहिती, आता आरोपींचे जबाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. बुधवारी ३१ व्या  साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. आता पुढील सुनावणीत  तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. त्यानंतर बचाव पक्ष काही जणांच्या साक्षी घेणार आहे.   
 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. विशेष सरकारी वकील निकम यांनी बुधवारी सकाळी पोलिस नाईक भाऊसाहेब मुरलीधर कुरुंद यांची अर्धातास सरतपासणी घेतली.  मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला १४ जुलैला श्रीगोंदे बसस्थानकातून ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. १६ जुलैला पिंपळवाडी येथे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याला ताब्यात घेतले. तो त्याच्या नातेवाइकांकडे लपला होता. १७ जुलैला पुण्यातील जहांगीर रुग्णालयासमोर तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याला ताब्यात घेतले. तो त्याच्या भावाला भेटायला पुण्यात गेला होता, असे कुरुंद म्हणाले.  आरोपींतर्फे अॅड. योहान मकासरे, बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी कुरुंद यांची उलटतपासणी घेतली.
 
जितेंद्र शिंदेला अटक केल्याची नोंद स्टेशन डायरीला केली का, अशी विचारणा मकासरे यांनी केली. त्यावर कुरुंद यांनी नाही, असे उत्तर दिले. आंदोलन सुरू झाल्यामुळे भवाळला अटक केल्याचा आक्षेप अॅड. खोपडे यांनी घेतला. कुरुंद यांनी त्याचा इन्कार केला. आहेर यांनी भैलुमेच्या अटकेच्या प्रक्रियेविषयी काही प्रश्न विचारले.  

आणखी नवे साक्षीदार
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांनी एकूण ३१ जणांची सरतपासणी घेतली. पोलिस नाईक कुरुंद हे अखेरचे साक्षीदार ठरले. यानंतर एकही साक्षीदार तपासणार नसल्याचे निकम यांनी जाहीर केले. २१, २२ व २३ जूनला होणाऱ्या सुनावणीला तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. बचाव पक्षाचे वकील त्यांच्या वतीने काही साक्षीदारांची यादी न्यायालयात देणार आहेत.  त्यानंतर त्यांचीही साक्ष नाेंदवली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...