आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठी रस्त्याचे बाराशे मीटरचे काम झाले पूर्ण, पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागील दीड वर्षापासून सुरू असलेले कोठी ते यश पॅलेस या दोन किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत बाराशे मीटर अंतरातील काँक्रिटीकरण, तर सातशे मीटर अंतरातील पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. पूर्ण झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. सुमारे चौदा कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम सुरू आहे. सुरूवातीला हे काम संथ गतीने सुरू होते, परंतु आता या कामास गती मिळाली आहे. शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी कामात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. रस्त्यावरील लहान-मोठी अतिक्रमणे, विजेचे खांब, जलवाहिन्यांचे स्थलांतर यासारखे अडथळे दूर करण्यासाठी मगर यांनी मनपाच्या इतर विभागांबरोबर समन्वयाने काम केले. आतापर्यंत बाराशे मीटर रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यश पॅलेस ते चाणक्य चौकापर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

कोठी परिसरात काही अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सुमारे दीडशे मीटरवरील रस्त्याच्या कामात अडचणी येत आहेत. परंतु ही अतिक्रमणे लवकरच काढून काम सुरू करण्यात येणार आहे. रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार संस्थेला पंधरा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत डिसेंबर २०१४ ला संपली. त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेले काम पाहता उर्वरित काम येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
बालिकाश्रम रस्त्याचे काम कासवगतीने सुरू
नगरोत्थान अभियानांतर्गत कोठी रस्त्यासह २१ कोटी खर्चाचे बालिकाश्रम रस्त्याचेही काम सुरू आहे. कोठीच्या अगोदर बालिकाश्रम रस्त्याचे काम सुरू झाले. परंतु या रस्त्याच्या कामात अनेक अडथळे असल्याने ते संथ गतीने सुरू आहे. परंतु उशिरा सुरू झालेल्या कोठी रस्त्याच्या कामास गती देऊन ते पूर्ण करण्यास मनपा प्रशासनाला यश मिळाले.

अंदाजपत्रकाप्रमाणे काम
कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. आयुक्त व महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कामातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. संपूर्ण काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू आहे.'' नंदकुमार मगर, शहर अभियंता