आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोतकरचा मुक्काम कोठडीतच, जामीनअर्ज खंडपीठाने फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेवगाव येथील लॉटरीविक्रेता अशोक लांडे याच्या खूनप्रकरणी कोठडीत असलेला काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्या वतीने दाखल करण्यात आलेला जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळला. या प्रकरणात जामीन मिळालेल्या संदीप, सचिन व अमोल कोतकर या तिघांचे जामीन रद्द करण्याची मागणीही खंडपीठाने फेटाळली.

लांडे खूनप्रकरणी न्यायालयात दोषारोप निश्चित होत नसल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारा अर्ज भानुदास कोतकरच्या वतीने खंडपीठात दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. भानुदास कोतकरचे पुत्र माजी महापौर संदीप व त्याचे भाऊ अमोल व सचिन कोतकर यांच्या वतीने जामिनासाठी घालण्यात आलेली जिल्हाबंदीची अट रद्द करण्यासाठीही अर्ज करण्यात आला होता. या अर्जावरील सुनावणीही पूर्ण झाली आहे. सरकारतर्फे, तसेच मूळ फिर्यादी शंकरराव राऊत यांच्या वतीने तिन्ही कोतकरपुत्रांचे जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणीही पूर्ण झाली होती.

यापैकी भानुदास कोतकरच्या जामीनअर्जावर व कोतकरपुत्रांचे जामीन रद्द करण्यासंदर्भात मूळ फिर्यादी राऊत व सरकार पक्षाच्या अर्जावर सोमवारी निर्णय झाला. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी हे दोन्ही अर्ज फेटाळून लावले. या निर्णयामुळे भानुदास कोतकरचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. तूर्तास तिन्ही कोतकरपुत्रांना जिल्ह्याबाहेरच मुक्काम ठोकणे अपरिहार्य आहे.