आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष - भाजीपाला, फळ लिलाव बाजार समितीत सुरू करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला व फळांची खरेदी-विक्री क रण्यासाठी लिलाव चालू करावा, अशी मागणी शेतकरी व व्यापा-यांनी केली आहे. तथापि, मागील चार महिने बाजार समितीच्या नेत्यांनी या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे व्यापारी व शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेवासे, घोडेगाव, कुकाणा या ठिकाणी उपआवार आहे. घोडेगाव कांदा मार्केटप्रमाणे जनावरांचा बाजार येथे मोठे उत्पन्नाचे साधन आहे. बाजार समितीच्या पदाधिका-यांचे नेवासे मुख्य आवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्याच्या ठिकाणी भव्य आवार असतानाही या ठिकाणी मात्र लिलाव होत नाही. त्यामुळे नेवासे शहराच्या अर्थकारणावर परिणाम होत आहे.

नेवासे शहरात बाजारतळावरच्या कमी जागेमध्ये भाजीपाल्यांचे व फळ खरेदी-विक्रीचे लिलाव सध्या होतात. अत्यंत कमी जागा असल्याने व ग्रामपंचायतीचेही या जागेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी तेथे शेतमाल आणण्यास इच्छुक नसतात. परिणामी गैरसोईमुळे तालुका व परिसरातील शेतकरी आपला माल नेवाशात आणत नाहीत. शेतमाल श्रीरामपूर, नगर, औरंगाबाद या ठिकाणी विक्रीसाठी जात आहे.

स्थानिक शेतकरी व व्यापारी बाजार समितीच्या आवारात लिलाव चालू करण्यासाठी बाजार समितीच्या सभापतींना मागील अनेक वर्षांपासून आग्रह करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीनेही जागा मागणीचा ठराव केला आहे. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. 18 एप्रिलला व्यापारी व शेतक-यांनी शेकडो सह्यांचे निवेदन बाजार समितीला दिले. परंतु स्थानिक राजकारणात व केवळ घोडेगाव बाजारावर समाधान मानणा-या बाजार समितीच्या प्रशासनाने व पदाधिका-यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे शेतकरी व व्यापा-यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नेवासे बाजार समिती आवारामध्ये त्वरित भाजीपाला व फळांचा खरेदी- विक्रीसाठी लिलाव करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यांतून होत आहे.

बाजार समिती आवाराऐवजी नेवाशात लिलाव
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाजार समितीच्या वतीने नेवासे येथे बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी केंद्र सुरू करून लिलाव व आठवडे बाजाराचे लिलाव करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही लिलाव नेवासे शहरातच होत आहेत.