आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या विकासासाठी झाला पाहिजे. देश सक्षम करायचा असेल, तर आधी अपंगांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. देशाच्या विकासाचे स्वप्न पाहण्यार्या तरुणाईने दुर्दम्य आशावाद जोपासावा, असा सूर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या नसीमा हुरजूक व ज्येष्ठ कवी-दिग्दर्शक गुलजार यांनी नेवासे तालुक्यातील सोनई येथे आळवला. निमित्त होते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. माशेलकर यांना, अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हुरजूक यांना व कला क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल गुलजार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख, आमदार शिवाजी कर्डिले, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
गुलजार म्हणाले, मी पूर्वी गॅरेजमध्ये कामाला होतो. तेथे वस्तू एकत्र जोडायचे काम करायचो. आताही तेच करतो, फरक एवढाच की आता लोकांच्या वेदना सांधायचे काम करतो. चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी मनोरंजनाचा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे जेवढे चित्रपट बनवले त्यातून सामाजिक संदेश देण्याचाच प्रयत्न केला. नसीमा हुरजूक यांनी शारीरिक व्यंगत्व असलेल्यांना व्यंग विसरून खर्या अर्थाने आत्मविश्वासाने चालायला शिकवले. मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे. पुढे हीच तरुणाई देशाचे भविष्य घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नसीमा हुरजूक म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे ‘हेल्पेज इंडिया’ संस्थेच्या कामाचा सन्मान आहे. प्रत्येक पुरस्कार घेताना 18 हजार अपंगांपर्यंत पोहचल्याचं कौतुक होतं. मात्र, त्याच वेळी लाखो अपंगांपर्यंत अजून पोहोचायचंय हे शल्यही बोचत असतं. पूर्वी अपंगत्व हे मागील जन्माचे पाप समजले जायचे, आता तसे नाही. अलीकडे खूप बदल होत असले, तरीही अजून बरेच काही बाकी आहे. आपल्या संस्थेला काजू प्रकल्पातून मिळणार्या उत्पन्नावर ‘व्हॅट’ भरावा लागतो. त्यामध्ये सवलत हवी. मात्र, शासन दरबारी होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अपंगांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सर्वांनी उचलावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. माशेलकर म्हणाले, आजही खेड्यांतल्या फक्त 20 टक्केच स्त्रिया साक्षर आहेत. खरा भारत अजूनही खेड्यातच राहतो. गावागावात तंत्रज्ञान आले. मात्र, त्याचा वापर सामान्यांसाठी होताना दिसत नाही. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची साक्षरता वाढवायला हवी. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान एकत्र आले पाहिजे. विकसित तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा. आजचा तरुण आशावादी आहे. त्यामुळे 21 वे शतक भारताचेच आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द असायला हवी. मी देशासाठी काय केले, हा प्रश्न प्रत्येकाने दिवसातून एकदा स्वत:ला विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
गुलजार यांच्या अंबरीश मिश्र अनुवादित ‘देवडी’ पुस्तकाचे नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरात प्रकाशन झाले. गुलजार यांनी पैस खांबाला हे पुस्तक अर्पण केले. या मराठी अनुवादाचे व नसीमा हुरजूक लिखित ‘चाकाची खुर्ची’ या पुस्तकांच्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.
यशवंत प्रतिष्ठानने बदलला ग्रामीण भागाचा चेहरामोहरा..
केवळ तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे विकास नव्हे. सामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना सोबत घेऊन चालणे महत्त्वाचे असते. यशवंतराव गडाख यांनी सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाचे रोपटे लावले. प्रशांत गडाख यांनी ते रोपटे प्रामाणिकपणे जोपासले. यशवंत प्रतिष्ठानने नेत्रदान, रक्तदान, गाव दत्तक घेणे या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे कार्य केले. त्यामुळे हे प्रतिष्ठान देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासकार्यात आदर्शवत आहे. तरुणाईने या प्रतिष्ठानचे बोट धरून चालले, तर देशाचा विकास अशक्य नाही अशा शब्दांत मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. प्रतिष्ठानने अपंगांच्या जनगणनेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन हुरजूक यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.