आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज..भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी पदाचा व पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर हंगामी अध्यक्षपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या पदातच शहर असा उल्लेख असून प्रदेशच्या घटनेनुसार महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र अध्यक्षाची तरतूद आहे. आगरकरांना जिल्हाध्यक्षपदाचा पदभार दिला, तर मूळपद स्थगित करावे लागेल. त्या पदावर अन्य एखाद्याची वर्णी लावूनच पुढचे पद नियुक्त करणे अथवा रिक्त ठेवणे, असे पर्याय पक्षश्रेष्ठींपुढे आहेत. ग्रामीण भागात परिचय व मुत्सद्देगिरीचा दबदबा असलेला नेता म्हणून पक्ष नेतृत्वाकडून लोकसभा निवडणुकीनंतर यावर निर्णय हाईल. परंतु आताच काहींनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी, तर काहींनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला आहे. सध्या तरी भाजपमध्ये जिल्ह्यात आमदार शिवाजी कर्डिले यांची वरपासून खालपर्यंत चलती असून मुंडे, गडकरी, तावडे, फडणवीस अशा सर्व नेत्यांना कर्डिले आपले वाटतात. त्यांच्या या गुणाचे नेमके रहस्य काय? असा तर्क कार्यकर्ते लढवून साहेब, तुम्हीच अध्यक्ष व्हा आणि विधानसभा निवडणुकीची जिल्ह्यात तयारी करा, असे सांगत कर्डिले निष्ठावंत म्हणून मिरवायची स्पर्धा सुरू आहे.

पाथर्डीत साखरसम्राट एकत्र आल्याची चर्चा
पाथर्डी तालुक्याच्या राजकारणात आता तीनही साखरसम्राट एकत्र आल्याचीच जास्त चर्चा आहे. प्रसंगानुरूप विविध निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी नेत्यांशी वाईटपणा घेणार्‍या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना आता अशा ‘साखरगोडी’ असलेल्या राजकारणाचा वीट आला आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी आमदार राजीव राजळे यांच्या ताब्यात वृद्धेश्वर साखर कारखाना, आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ताब्यात ‘ज्ञानेश्वर’, तर अँड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात ‘ केदारेश्वर’ हे कारखाने आहेत. ‘केदारेश्वर’मधून आगामी गाळप हंगामातून उत्पादित होणारी साखर ही ‘ज्ञानेश्वर’, ‘वृद्धेश्वर’च्या विचारांची होणार असल्याने ग्राहकांना साखरेचा फरक कळणार नसला, तरी ‘केदारेश्वर’ने मात्र, ‘ज्ञानेश्वर’ची गाळप क्षमता व कमी अंतर पाहून आतापासूनच साधलेली जवळीक चर्चेचा विषय ठरला आहे.