आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलिकराव जगताप यांचे निधन; जिल्ह्यातील अनुभवी नेता गमावला : विखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांचे वडील कुंडलिकराव (तात्या) रामराव जगताप (६९) यांचे रविवारी सकाळी १०.३३ वाजता कोईमतूर येथील केएमसीएच हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता पिंपळगाव पिसा येथे कुकडी कारखाना कार्यस्थळावरील लमाणबाबा देवस्थानाशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

नगर जिल्ह्याचे राजकारण, सहकार सामाजिक क्षेत्रात तात्या या नावाने प्रसिद्ध असलेले कुंडलिकराव काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. उपचारांसाठी त्यांना तामीळनाडूतील कोईमतूर येथील कोवई मेडिकल सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. यावेळी पुत्र आमदार राहुल, पत्नी अनुराधा यांच्यासह जगताप यांच्या कन्या जवळचे नातेवाईक उपस्थित होते. कुंडलिकराव यांचे पार्थिव सोमवारी पहाटे विमानाने कोईमतूरहून पुण्यात येईल. तेथून ते मोटारीने पिंपळगाव पिसा येथे आणण्यात येईल. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ संघर्ष करत जगताप यांनी कुकडी सहकारी साखर कारखाची निर्मिती केली. उत्तम प्रशासन देखभाल असलेल्या प्रमुख कारखान्यांमध्ये ‘कुकडी’चा समावेश आहे. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी कारखान्याची सूत्रे स्वतःकडे ठेवली. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही जगताप यांनी दीर्घकाळ काम पाहिले. श्रीगोंदे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य ही पदे त्यांनी भूषवली. कुकडी कालव्याच्या आवर्तनासाठी त्यांनी संघर्ष केला. मुलगा राहुल यांना आमदार करण्यासाठी त्यांनी तालुक्यातील पाचपुते विरोधकांना पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आणले. कुंडलिकराव यांच्यामागे पत्नी अनुराधा, मुलगा राहुल यांच्यासह अश्विनी देशमुख, मनीषा काळे, जयश्री काळे सुजाता सोले या मुली, तीन भाऊ, एक बहीण, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. 

जिल्ह्यातील अनुभवी नेता गमावला : विखे 
कुंडलिकरावजगताप यांच्या निधनाने जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेता गमावला. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा जनसामान्यांत निर्माण केला होता. श्रीगोंदे तालुक्यातील शेती, सहकार आणि पाणीप्रश्नाबाबत त्यांची सदैव आग्रही आणि वेळप्रसंगी संघर्षाची भूमिका राहिली, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...