आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuwalekar Family Fight With Leopard ; Shephord Husaband wife Injured

कुळेकर कुटुंबाची तासभर बिबट्याशी थरारक झुंज ; मेंढपाळ पती-पत्नी जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - कळपात घुसलेल्या बिबट्याला पळवून लावून मेंढय़ांना वाचवण्याच्या प्रयत्नांत मेंढपाळ असलेले कुळेकर पती-पत्नी जखमी झाले. ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर शिवारात 14 मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढय़ा ठार झाल्या, तर अन्य दोन मेंढय़ा जखमी झाल्या, पण बाकीच्यांचा जीव वाचला.

रेऊबाई कुळेकर (राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचे कुटुंब आपल्या 50 मेंढय़ा घेऊन बेलापूर शिवारात चरण्यासाठी आले होते. मेंढय़ा चरल्यानंतर त्यांनी रात्री बेलापूरच्या कोटमारा लघूप्रकल्पाच्या जंगलात तळ ठोकून मेंढय़ांना वाघूरमध्ये कोंडले. मध्यरात्री एकच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने वाघूर तोडून कळपात प्रवेश केला. या वेळी मेंढय़ा सैरावैरा धावू लागल्या. बिबट्याने मेंढय़ांवर हल्ला केल्याचे कुळेकर कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला चढवला. यामध्ये रावा कुळेकर (27), त्यांची पत्नी पिंकाबाई कुळेकर हे दोघेजण जखमी झाले. तासभर बराच संघर्ष केल्यानंतर भिवा व रेऊबाई यांना बिबट्याला हुसकावण्यात यश आले. त्यानंतर या दोघा जखमींना अकोले येथील डॉ. कानवडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.ह्म

या घटनेबद्दल वनखाते अद्याप अनभिज्ञच आहे. वनक्षेत्रपाल जे.डी. गोंदके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याकडे वन विभाग दुर्लक्ष करून आपली जबाबदारी झटकत असल्याबद्दल शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात रेऊबाई कुळेकर म्हणाल्या, सध्या दुष्काळ आहे. मुक्या जनावरांना खायला चारा नाही. मेंढय़ांना जगवण्यासाठी आम्ही पुण्याहून अकोले तालुक्यात आलो आहोत, परंतु बिबट्याने आमच्यावर हल्ला केल्याने झोप उडाली आहे.

उपचाराचा खर्च देऊ
वनपाल इथापे हे ब्राणवाडा येथे राहतात. ही घटना लपून राहण्यासारखी नाही. त्यामुळे अशी काही घटना घडलीच नसून श्रीरामपूर तालुक्यात चौकशी करा, आम्हीही तपास करू. घटना घडली असल्यास उपचाराचा खर्च जखमींना देऊ.’’ जे. डी. गोंदके, वनक्षेत्रपाल, अकोले.
जखमींची प्रकृती स्थिर
बिबट्याने रावाच्या उजव्या हाताच्या पंजाला कडकडून चावा घेतला आहे. रेबिजचे इंजेक्शन दिले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.’’ डॉ. जे. टी. कानवडे, अकोले.
तर बिबट्याने सर्व मेंढय़ा ठार केल्या असत्या
बिबट्याने कळपावर हल्ला चढवून एका पाठोपाठ एक मेंढय़ा ठार करायला सुरुवात केली. झोपेतून उठून बिबट्याला हुसकावण्यासाठी झुंज दिली. त्या वेळी बायको, आई व भाऊ यांनी मदत केली. बायकोलाही बिबट्याने जखमी केले. बिबट्याला पिटाळले नसते तर त्याने सर्व मेंढय़ा ठार केल्या असत्या. वनखात्याला कळवायला वेळच मिळाला नाही.’’ रावा कुळेकर, जखमी मेंढपाळ.
वन विभाग अनभिज्ञ
अकोल्याचे वनक्षेत्रपाल जे.डी.गोंदके, वनपाल पी. एस.इथापे यांना या घटनेबद्दल माहिती नव्हती. यासंदर्भात त्यांनी कानावर हात ठेवले. वन कर्मचार्‍यांनी ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे घडल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यातच धन्यता मानली.