आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत कामगाराच्या वारसाला ग्रॅच्युईटी द्या, ग्रामपंचायतीला कामगार न्यायालयाचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सफाई कामगाराच्या निधनानंतर त्याच्या वारसाला ग्रॅच्युईटी नाकारणाऱ्या ग्रामपंचायतीला कामगार न्यायालयाने चपराक दिली आहे. तक्रारदार महिलेला ग्रॅच्युईटीचे २५ हजार २११ रुपये व त्यावरील व्याज देण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीला ही रक्कम द्यावी लागणार आहे.
पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट १९७२ अन्वये ज्या ठिकाणी किमान १० कर्मचारी आहेत, अशा सर्व आस्थापना, दुकाने यांना ग्रॅच्युईटीनुसार उपदान देणे बंधनकारक आहे. कोळगाव ग्रामपंचायतीत मधुकर उजागरे हे १९८७ पासून सफाई कामगार म्हणून काम करत होते. सन २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारसाला ग्रॅच्युईटी देणे ग्रामपंचायतीला बंधनकारक होते, पण ग्रामपंचायतीने ही रक्कम दिली नाही. मधुकर उजागरे यांची पत्नी शकुंतला उजागरे यांनी वारंवार तोंडी मागणी केली. नंतर उजागरे यांच्या वतीने ग्रामपंचायतीला नमुना नोटीस देण्यात आली, तरीही ग्रामपंचायतीने कोणतीच दखल घेतली नाही.

त्यामुळे शकुंतला उजागरे यांच्या वतीने नगरच्या कामगार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. कामगार न्यायालयाने नोटीस बजावूनही ग्रामपंचायत न्यायालयात हजर झाली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या वतीने १३ ऑक्टोबरला एकतर्फी आदेश करण्यात आला. शकुंतला मधुकर उजागरे यांना ग्रामपंचायतीने २५ हजार २११ रुपये व २४ जुलै २०१० पासून रक्कम देईपर्यंतचे व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात उजागरे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी काम पाहिले. त्यांना संघटनेचे उपाध्यक्ष मनोज घालमे व संदीप आल्हाट यांनी सहकार्य केले.