आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: समन्वय अभावी उडाला कारभाराचा बोजवारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेला प्रथमच आयएएस केडरचे आयुक्त, पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त एक सहायक आयुक्त मिळाले. मात्र, अधिकारी, कर्मचारी पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने महापालिका कारभाराचा बोजवारा उडाला असल्याचेच सध्याचे चित्र आहे. हे पाच अधिकारी एका दिलाने महापालिकेच्या कारभारात सुधारणा करतील, सुमारे १८४ कोटींची थकबाकी वसूल करून रखडलेल्या विकासकामांना गती देतील, अशीच नगरकरांची अपेक्षा होती. रखडलेल्या पाणी योजनेचे पाप प्रशासनाचेच आहे, असा आरोप पदाधिकारी करत असले, तरी सर्व काही आलबेल असल्याचे सोंग प्रशासनाने घेतले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात येणाऱ्या काळात, तरी सुधारणा होईल का? याबाबत शंकाच आहे.
महापालिकेत तब्बल दोन हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे ३२ अधिकाऱ्यांचे या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे. परंतु हे नियंत्रण केवळ नावापुरतेच आहे. महापालिकेला आयएएस दर्जाचा आयुक्त मिळावा, ही अनेक दिवसांची मागणी आयुक्त दिलीप गावडे यांच्या स्वरूपात पूर्ण झाली. आयएएस केडरचे आयुक्त गावडे यांनी पदभार स्वीकारला, तेव्हापासून नगरकरांच्या अपेक्षाही वाढल्या. विशेष म्हणजे आयुक्तांच्या जोडीला अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे सहायक अायुक्त विक्रम दराडे हे खमके अधिकारी असल्याने कारभाराला गती मिळणे आवश्यक होते. परंतु तसे होता महापालिका कारभाराची परिस्थिती "जैसे थे'च आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या (फेज टू) कामास गती देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच रखडलेल्या या पाणी योजनेचे पाप प्रशासनाचेच असल्याचा आराेप पदाधिकारी करत आहेत. शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल १८४ कोटी रुपयांची थकबाकी असून ती वसूल करण्याऐवजी प्रशासन हातावर हात धरून बसले आहे. महापालिकेच्या एकूण उत्पन्नातून तब्बल पाच कोटी रुपये दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत आहेत. सर्वसामान्य नगरकरांनी भरलेल्या कराच्या पैशातून हा खर्च भागवला जातो. परंतु त्याबदल्यात करदात्या नगरकरांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळेच आयुक्तांसह पाचही जबाबदार अधिकाऱ्यांनी आता कामाला लागले पाहिजे, अशा प्रतिक्रिया नगरकर व्यक्त करत आहेत.

हे प्रश्न सुटणार का?
> वाढती पक्की अतिक्रमणे
> धनदांडग्यांनी थकवलेला १८४ कोटींचा कर
> रखडलेली शहर पाणी योजना
> सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे
> कचऱ्याचे भिजत घोंगडे
> नेहरू मार्केट इमारतीची उभारणी
> पार्किंग नसलेल्या रुग्णालयांची मनमानी
> साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष

अधिकारीच अोढतात एकमेकांचे पाय
महापालिकेत अनेक अधिकारी कर्मचारी एकमेकांचे पाय आेढण्याचे काम करतात. एखादा अधिकारी- कर्मचारी चांगले काम करत असेल, तर त्याच्याकडील जबाबदारी काढून ती दुसऱ्यांना देण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कामही काही वरिष्ठ अधिकारी करतात. त्यामुळेच महापालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकारीही टोळीत सामील
महापालिकेत काम करणाऱ्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. काही तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची घरे पाहिली, तर सर्वसामान्यांचे डोळे दिपून जातात. मनपाचा कारभार सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. पण हे अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांच्या टोळीत सहभागी होऊन नगरकरांना लुटतात.हे अधिकारी- कर्मचारी म्हणजे अलिबाबाची टोळीच आहे. अॅड.श्याम असावा, सामाजिक कार्यकर्ते.
बातम्या आणखी आहेत...