आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lack Of Knowledge On Gas Cylinder Subsidy In Customer

सिलिंडर अनुदानाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गॅसचे अनुदानित सिलिंडर सध्या साडेचारशे रुपये दराने शहरात विकले जात आहे. अनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, ती रक्कम केव्हापासून बँक खात्यात जमा केली जाईल, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. पुरवठा विभाग व गॅस एजन्सीचालकही अनुदानाबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

गॅसचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊन सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक अजून महागाईच्या खाईत लोटले गेले आहेत. प्रारंभी वर्षाला केवळ सहा सिलिंडर अनुदानावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 19 जानेवारीला 9 सिलिंडर देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. अनुदानित गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याबाबत पुरवठा विभाग व एजन्सीचालकांनी सूचना दिल्या होत्या. विनाअनुदानित सिलिंडर 940 रुपयांना आहे, तर अनुदानित सिलिंडर 450 रुपयांना आहे. सध्या गॅसचे अनुदानित सिलिंडर 450 रुपयांना दिले जात आहे. अनुदानित सिलिंडरचे अनुदान केंद्र सरकार ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. मात्र अनुदान देण्याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. आतापर्यंत 50 हजार 445 गॅस ग्राहकांनी शहरातील नऊ राष्ट्रीयीकृत बँकांत खाती उघडली आहेत. शहरात अद्याप 1 लाख 12 हजार ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडलेली नाहीत. केंद्र सरकारने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये कपात केली होती. तसेच, ऑनलाईन सेवा सुरू करण्याच्या सूचना एजन्सीचालकांना दिल्या होत्या. शहरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्थान पेट्रोलियम व इन्डेन या तीन कंपन्या शहरातील गॅसधारकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. गॅससाठी एजन्सींनीही ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. मात्र, बुकिंग करूनही पाच-पाच दिवस सिलिंडर मिळत नाहीत. शहरात गॅसचा काळाबाजार सुरूच असून, 22 जानेवारी स्थानिक पोलिसांनी अरणगाव येथे एका किराणा दुकानात छापा घालून दहा गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे शहर व परिसरात गॅसचा काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शहरात गॅसचा काळाबाजार होत नसल्याचा दावा अनेकदा पुरवठा विभागाने केला आहे. मात्र, अजूनही शहरात काळ्याबाजारात सिलिंडरची विक्री सुरूच असून ,काळ्याबाजारात एक गॅसची टाकी 1300 ते 1500 रुपये दराने मिळत असून काळाबाजार रोखण्यात अपयश येत आहे.