आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला शिक्षकांची दुर्गम भागात कसरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या दरवर्षी ज्येष्ठतेनुसार आदिवासी भागात बदल्या केल्या जातात. या बदली प्रक्रियेनंतर महिला शिक्षकांना पदोपदी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे इतर तालुक्यांतून आदिवासी भागात बदलून जाणाऱ्या महिलांना ही बदली म्हणजे शिक्षाच वाटते. शासनानेच जर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर कोणीही खुशीने या भागात नोकरीला जाईल, अशा प्रतिक्रियाही काही महिला शिक्षकांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्याला पर्यटकांकडून पसंती दिली जाते, पण तेथे नोकरी करायची म्हटल्यास नोकरदारवर्गाच्या अंगावर काटा येतो. या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने काही धोरणे ठरवली आहेत. त्यानुसार दरवर्षी पेसांतर्गत ज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांच्या आदिवासी भागात प्रशासकीय बदल्या केल्या जातात. दरवर्षी पंधरा ते वीस बदल्या होतात. यंदा सुमारे ५७ बदल्या या भागात इतर तालुक्यांमधून झाल्या. त्यात ४३ महिला आहेत. शिक्षक दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने या महिलांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. आमचे नाव छापू नका, अन्यथा प्रशासकीय जाचाला सामोरे जावे लागेल, असे अनेक महिलांनी सांगितले.
अकोले तालुक्यात भंडारदरा, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे आदी अतिदुर्गम भागात महिला शिक्षक कार्यरत आहेत. या भागात अपवाद वगळता कुठेही फोनला रेंज नाही. या भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने उपलब्ध जागा पर्यटकांना भाडेतत्वावर िदल्या जातात. त्यामुळे शिक्षकांना शेंडी, कोतूळ, राजूर या गावी खोली घेऊन रहावे लागते. या ठिकाणांहून ज्या गावातील शाळेत नियुक्ती आहे, हे अंतर २५ ते ३० किलोमीटरवर असते. शाळेत जाण्यासाठी एसटी बसही उपलब्ध नाही. शालेय कामकाज संपवून घरी परत येण्यासाठीही वाहन मिळत नाही. त्यामुळे एकट्या महिलेला नियुक्तीच्या गावी खोली मिळाली तरी राहणे अडचणीचेच वाटते. शासनाने या अडचणींचा विचार करून महिलांना पेसाच्या बदल्यांमधून सूट द्यावी, अशी मागणीही होत आहे. पण नियमांच्या चौकटीत राहून काम करणारे शासन आणि उदासीन राज्यकर्ते यांना या अडचणींचे काहीच देणे-घेणे नसल्याने महिलांच्या अडचणी जैसे थे आहेत.
प्रवासावर मोठा खर्च
नियुक्तीच्याठिकाणी राहण्याची चांगली सोय नसल्याने २५ ते ३० किलोमीटरवरून शाळेत जाणाऱ्या महिला शिक्षकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी दरमहा दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. याव्यतिरिक्त इतर अडचणीही अनेक आहेत. त्यामुळे काही शिक्षिका आदिवासी भागात खोली घेऊन एकत्र राहतात.
पायाभूत सुविधा द्या
नियुक्तीच्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. वेळेवर वाहन मिळत नाही, मोबाइल फोनला रेंज नाही, स्वच्छतागृहे नाहीत, पिण्याच्या पाण्याचीही अडचण, राहण्यासाठीही खोली मिळत नाही. शासनाने मूलभूत सुविधा दिल्या, तर खुशीने नोकरी करता येईल. एक महिला शिक्षक.
बातम्या आणखी आहेत...