आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lal Krishna Advani Resignation Reaction In Nagar Leader

अडवाणी कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त समजताच पक्ष कार्यकर्त्यांत खळबळ उडाली. जिल्ह्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना अडवाणी यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत ते कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

नाराजी दूर करण्यात यश मिळेल
अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना व समाजाला आदर आहे. आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत ते आजारी पडल्याचे वृत्त कुठेही आले नाही. मला खात्री आहे, आमचे नेते व कार्यकर्ते त्यांच्या मनातील नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील. प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची केलेली निवड हा एकमुखी निर्णय आहे. त्याचा अडवाणींच्या राजीनाम्याशी संबंध नाही.
दिलीप गांधी, खासदार.

दोन दिवसांत समेट होईल
अडवाणी यांच्या राजीनाम्याबद्दल प्रसारमाध्यमांवर सातत्याने चर्चा सुरू आहे. वास्तविक त्यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे. केंद्रातील, तसेच इतर सर्व ज्येष्ठ नेते अडवाणींशी चर्चा करतील. दोन दिवसांत हा समेट घडून येईल, अशी आमची खात्री आहे.
राम शिंदे, आमदार व जिल्हाध्यक्ष.

त्यांच्या नेतृत्वाची देशाला गरज
पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत अडवाणी यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाची गरज पक्षालाच नाही, तर देशालाही आहे. देश संक्रमण अवस्थेतून जात आहे. अशा अवस्थेत त्यांच्यासारख्या प्रगल्भ अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे की, ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाही.
प्रताप ढाकणे, माजी जिल्हाध्यक्ष.

राजीनामा मागे घेतील
अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांचे वारे वाहू लागल्याने त्यांना अडवाणींनी आशीर्वाद द्यावा. त्यांचा राजीनामा ही पक्षासाठी दुर्दैवी घटना आहे. वरिष्ठ नेते अडवाणी यांची निश्चितच समजूत काढतील, असा आमचा विश्वास आहे.
चंद्रशेखर कदम, माजी आमदार.