आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरीसाठी आले अन् हायकोर्टाचे समन्स घेऊन गेले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी कोतकर बंधूंना जामीन मंजूर करताना जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. परंतु या अटीमुळे त्यांचा नेमका पत्ता पोलिसांना कळू शकत नाही. हे आरोपी शुक्रवारी नगरच्या न्यायालयात हजेरीसाठी आले असताना पोलिसांनी त्यांना उच्च न्यायालयाचे एक समन्स बजावले. हजेरीसाठी आले अन् हायकोर्टाचे समन्स घेऊन गेले, अशी चर्चा त्यामुळे शहरात सुरू होती.
माजी महापौर संदीप भानुदास कोतकर, त्याचा भाऊ सचिन व अमोल यांना जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपींनी जिल्ह्यात प्रवेश करू नये, या प्रमुख अटीवर हा जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी सानपाडा, नवी मुंबई येथे राहत असल्याचा पत्ता देण्यात आला होता.
या आरोपींचा जामीन रद्द करावा, या मागणीसाठी सरकार पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यात आले आहे. या अपिलावर 17 जुलैला सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्याचे समन्स आरोपींना पाठवण्यात आले होते. ते समन्स घेऊन नगरचे पोलिस सानपाडा येथील पत्त्यावर गेले. परंतु त्यांना आरोपी तेथे आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी हात हलवत परतावे लागले.
शुक्रवारी जिल्हा न्यायालयात मूळ प्रकरणाची तारीख असल्याने कोतकर बंधू न्यायालयात आले होते. त्यामुळे जिल्हा सरकारी वकील अँड. सतीश पाटील यांनी आरोपींना उच्च न्यायालयाचे समन्स बजावण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने तशी परवानगी दिली. नंतर आरोपी संदीप व सचिन यांना समन्स बजावण्यात आले. अमोल कोतकर मात्र उपस्थित नव्हता.
जामिनाच्या अटींनुसार आरोपींना जिल्ह्यात प्रवेश करायला मनाई आहे. आरोपी जेथे राहणार असतील तेथील पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. परंतु यामुळे आरोपींचा नेमका पत्ता न्यायालयाला व पोलिसांनाही लवकर समजू शकत नाही. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी आता आशुतोष करमरकर यांच्यासमोर सुरू झाली आहे. पुढील सुनावणी 21 जुलैला होणार आहे. याच प्रकरणातील आणखी एक आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाबंदीची अट रद्द करावी, या मागणीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. आरोपी भानुदास कोतकर यानेही जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जांवरील सुनावणी 21 जुलैलाच होणार आहे.