आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार चळवळ टिकवून ठेवावी, बाळासाहेब विखे यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहाता - राहुरीकरांनी कधी घडणारी घटना घडवून एक इतिहास निर्माण केला. निवडून आलेल्या नवीन संचालकांनी एकोपा धरून चांगले काम करावे. सभासद आणि संचालक हे कोणी वेगळे नाही त्यामुळेच सभासदांचा सन्मान राखा आणि प्रपंच अवलंबून असलेल्या सहकाराला टिकवून ठेवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी गणेश आणि डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांना केले.

गणेश आणि डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार डॉ. बाळासाहेब विखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्व संचालकांना मार्गदर्शन करून, पुढील आव्हानांची जाणीवही करून दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,भाऊसाहेब विखे, विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे, संचालक विक्रांत विखे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेशराव कर्पे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, डॉ. भास्करराव खर्डे, राजेंद्र लहारे, राहुरी पंचायत समितीच्या उपसभापती मंदा डुकरे, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, अॅड. तान्हाजी धसाळ, राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चाचा तनपुरे, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे आदी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी सर्व नवनिर्वाचित संचालकांनी डॉ. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर जाऊन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या शक्तिस्थळाला अभिवादन केले. गणेश आणि तनपुरे कारखान्याच्या सर्व संचालकांनी डॉ. विखे यांचा सत्कार केला. डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले, अडचणीच्या परिस्थितीत गणेश दोन वर्षे चालवला. अजूनही तो चांगला करावा लागेल. राहुरीचे तर काय कुंपणाने शेत खाल्ले. तालुक्यात दुसरा कारखाना नको हा विचार स्व. बाबुराव दादांनीच मांडला होता. दुसरा कारखाना काढला, तर कीड लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी आठवण करून देत ते म्हणाले, त्यांच्याच चिरंजिवांनी दुसरा कारखाना काढला आणि स्वत:च्या स्वार्थासाठी या कारखान्याचा निकाल लावला. स्वत:चाही चालवायचा आणि सभासदांचाही चालवायचा असे कधी होत नसते. अखेर सभासदांच्या मालकीचा कारखाना बंद पडला, असे नमूद करून त्यांनी माजी मंत्री खताळ यांच्या एका भाषणाचा दाखला दिला.

आमच्यावर सहकाराचा आहे संस्कार
डॉ. बाळासाहेब विखेंच्या मार्गदर्शनाने आपण सर्व कार्यकर्ते यशस्वी करीत आहोत. राहुरीची निवडणूक ही सहकारातील ऐतिहासिक निवडणूक झाली. सभासदांनी निर्णायक कौल देऊन ही कामधेनू सुरू होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. सहकाराचा संस्कार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर आहे. त्याची जपवणूक करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पद्मश्रींनी सहकाराची मुहूर्तमेंढ रोवली. त्यानंतर जिल्ह्यात अनेक कारखाने उभे राहिले. हे कारखाने उभे करण्यात पद्मश्रींचा वाटा मोठा होता. आज जे दिसतात ते त्यावेळी कुठेही नव्हते. पण काळाच्या ओघात माणूस बऱ्याच गोष्टी विसरून जाताे. त्यांना कधीतरी आता काळाच्या ओघात जाणीव करून देण्याची वेळ आली, असा टोला यावेळी आपल्या भाषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना लगावला.
बातम्या आणखी आहेत...