आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lawyer Group Start Environment Promotion In Nager

पर्यावरण संवर्धनासाठी वकील संघाचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जागतिक तापमानवाढीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शहर वकील संघाने पुढाकार घेतला आहे. आठवडाभरात एक हजार केशर आंब्यांची रोपे न्यायाधीश, कर्मचारी वकिलांना संघाकडून मोफत देण्यात येणार आहेत. प्रत्येकाने किमान एक झाड घराच्या आवारात लावून ते जगवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अॅड. मुकुंद पाटील यांनी दिली.

वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढीमुळे निसर्ग लहरी बनत आहे. त्याचे दुष्परिणाम शेतक-यांसह सर्वांनाच सहन करावे लागत आहेत. जागतिक तापमानवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात शहर वकील संघाने सक्रिय उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून केशर आंब्यांची एक हजार रोपे संघाने घेतली आहेत. येत्या आठवडाभरात ही रोपे न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, तसेच वकिलांना मोफत देण्यात येणार आहेत. प्रत्येकाने आपल्या घराच्या आवारात किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, यासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली.

संघाचे अॅड. नरेश गुगळे, अॅड. सुभाष काकडे, उपाध्यक्ष अॅड. मंगेश सोले, सचिव अॅड. अभिषेक भगत, अॅड. अनिता दिघे, अध्यक्ष अॅड. पाटील, अॅड. कारभारी गवळी आदींनी या वृक्षदान मोहिमेत पुढाकार घेतला आहे. संघाचे ज्येष्ठ सदस्य अॅड. गुगळे यांसदर्भात म्हणाले, वकील वर्ग हा समाजात अग्रणी मानला जातो. पर्यावरणाच्या प्रश्नात सर्वच आघाड्यांवर लक्ष देणे ही या वर्गाची जबाबदारी आहे. न्यायालयात काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या घराच्या आवारात यंदा किमान दोन शतायुषी झाडे लावण्यात यावीत, अशी अपेक्षा आहे.

अध्यक्ष अॅड. पाटील म्हणाले, वकील वर्गाबरोबरच शहरातील प्रत्येक नागरिकाने घराच्या आवारात किंवा परसबागेत किमान दोन-तीन फळझाडांची लागवड करणे आवश्यक आहे. यातून नगर शहर अधिक हिरवेगार करण्यात मदत होईल. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामागे शहरातील झाडांची अधिक असलेली संख्या कारणीभूत आहे. पाऊस पडण्यास भाग पाडणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव नागरिकांमध्ये करणे गरजेचे आहे. लोकशिक्षणाचा भाग वकिलांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नगर शहरातील काही व्यक्ती समाजसेवी संघटनांनी यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ठरवले आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

जोशी यांच्या हस्ते रोपांचे वाटप होणार
गेल्याकाही वर्षांपासून मान्सूनचा पावसाची अनियमितता वाढली आहे. परिणामी सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना नित्याचीच बाब झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहर वकील संघाने प्रत्यक्ष कृतीतून उचललेल्या पावलाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश विनय जोशी यांच्या हस्ते रोपांचे वाटप करून उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. पाटील यांनी दिली.