आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूची साथ: बेशिस्त, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे महापौरांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील साथीच्या रोगांबाबत महापौर अभिषेक कळमकर यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले.
शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केडगाव, बुरूडगाव रस्ता, तसेच स्टेशन रस्ता परिसरातील सात रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून ४५ पेक्षा अधिक रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने पीडित आहेत. मलेरियानेदेखील अनेक रुग्ण त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर कळमकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर आदी उपस्थित होते. ज्या भागात साथरोगाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात तातडीने धूर औषध फवारणी करण्याचे आदेश कळमकर यांनी दिले. शहरातील सर्वच भागात साथरोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, सर्व शाळा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच झोपडपट्टी परिसरात डासांची उत्पत्ती टाळण्याबाबतची माहिती प्रदर्शित करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पावसाळ्याचे दिवस असल्याने कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावा, धूर औषध फवारणीचा कार्यक्रम आखून त्याची योग्य अंमलबजावणी करा, जनजागृतीचा कार्यक्रम तत्काळ हाती घ्या, या कामात जे कर्मचारी हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कळमकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छता विभागाकडून नियमितपणे सकाळी १० ते दुपारी या वेळेत गँगवर्क करून कचरा उचलला पाहीजे. पदाधिकाऱ्यांसह अधिकारी अचानक स्वच्छतेची पाहणी करतील. गैरहजर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे कळमकर यांनी स्पष्ट केले.