आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरसूचीत सुधारणा न झाल्यास बहिष्कार; ‘एलबीटी’बाबत व्यापार्‍यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एलबीटी दरसूचीत जोपर्यंत सुधारणा होत नाही, तोपर्यंत कर भरणार नाही, असा पवित्रा शहरातील व्यापारी वर्गाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला. स्थानिक संस्था कर (एलबीटी) दरसूचीबाबत अनेक तक्रारी आल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी महापौर शीला शिंदे यांनी ही बैठक घेतली. व्यापार्‍यांच्या या निर्णयामुळे महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
आमदार अनिल राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक नितीन जगताप, माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी एलबीटी दरसूचीबाबतची भूमिका स्पष्ट केली. पोपट बोथरा म्हणाले, एलबीटीचे दर जकातीप्रमाणेच राहतील, असे मनपा प्रशासनाने सांगितले होते. मात्र, जकात व एलबीटी दरात मोठी तफावत आहे. प्रशासनाने शासनाकडे पाठवलेल्या दरसूचीची प्रत व्यापार्‍यांना द्यावी. जोपर्यंत दरसूचीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत एकही व्यापारी कर भरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सराफ संघटनेचे नीळकंठ देशमुख म्हणाले, अनेकजण अडचणीच्या वेळी सोने मोडतात. अशा वेळी त्यांच्याकडून एलबीटी वसूल करणे योग्य नाही. त्यामुळे सोन्याच्या मोडीवर एलबीटी घेऊ नये. दिलीप कटारिया म्हणाले, मनपा प्रशासनाने समन्वय समितीची स्थापना करून दरसूची निश्चित केली असती, तर हा गोंधळ झाला नसता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, सुधारित एलबीटी लागू होईल. परंतु तसे न होता जुनाच एलबीटी लागू झाला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचा विश्वासघात झाला. मिरची व्यापारी संघटनेचे गोपाल मणियार म्हणाले, प्रशासन केवळ गोलमाल उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. व्यापार्‍यांना एलबीटी भरायचा आहे. मात्र, तो दरसूचीत सुधारणा झाल्यानंतरच भरण्यात येईल.
व्यापार्‍यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. व्यापार्‍यांच्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचवून दरसूचीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू असे, असे आश्वासन आमदार राठोड यांनी दिले.