आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलबीटी’बाबत व्यापारी संभ्रमातच..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) कार्यवाहीबाबत व्यापार्‍यांचा संभ्रम अजून कायम आहे. एलबीटी लागू होऊन दहा दिवस उलटले, तरी मनपा प्रशासनाने व्यापार्‍यांशी एकदाही संवाद साधलेला नाही. विशेष म्हणजे एलबीटीच्या नोंदणी प्रमाणपत्रांमुळे अधिकार्‍यांचाही गोंधळ उडाला आहे.
एक जुलैपासून एलबीटी लागू झाला. संत कैकाडीमहाराज व्यापारी संकुल येथील एलबीटीच्या मध्यवर्ती कार्यालयात सध्या नोंदणी प्रमाणपत्राचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत व्यापार्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत असले, तरी आतापर्यंत किती व्यापार्‍यांची नोंदणी झाली, त्यांना प्रमाणपत्र कधी मिळणार, व्हॅटधारक नसलेल्या व्यापार्‍यांची नोंदणी कशी आणि कधी करणार, भरणा करण्यासाठी बँकखाते क्रमांक कधी देणार, विवरणपत्राचा अर्ज कसा भरायचा यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एलबीटी लागू होण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीत व्यापार्‍यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अद्यापि निरसन करण्यात आलेले नाही. व्यापार्‍यांची समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एलबीटी लागू होऊन दहा दिवस उलटले, तरी व्यापार्‍यांच्या शंका, तक्रारी, तसेच मागण्यांबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
विक्रीकर विभागाकडून मनपाला मिळालेल्या व्यापार्‍यांच्या यादीपैकी किती जण एलबीटी भरण्यास पात्र आहेत, याबाबतचा निश्चित आकडाही अद्यापि अधिकार्‍यांना माहिती नाही. यादी मिळून महिना झाला, पण यादीच्या छाननीचे काम पूर्ण झालेले नाही. शहरातील सर्व व्हॅटधारक व्यापार्‍यांना आठ दिवसांत नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, पंधरा दिवस उलटले, तरी एकाही व्यापार्‍याला नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. एलबीटीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी मनपा प्रशासनाने बैठका व चर्चासत्रे घेण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.
मनपा विश्वासात घेत नाही - मनपा प्रशासन व्यापार्‍यांना विश्वासात घेत नाही. एलबीटी काय आहे ते समजले, पण व्यापार्‍यांच्या शंका अजूनही दूर झालेल्या नाहीत. एलबीटी लागू झाल्यावर प्रशासनाने एकदाही व्यापार्‍यांशी संवाद साधला नाही. ’’ दिलीप कटारिया, व्यापारी.
नोंदणीबाबत गोंधळ - मनपा प्रशासनाने एलबीटीच्या कार्यवाहीसाठी नेमलेल्या अधिकार्‍यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे व्यापार्‍यांच्या शंका ते कशा दूर करतील? उलट नोंदणीबाबत त्यांचाच गोंधळ उडाला आहे. व्हॅटधारक व विनाव्हॅटधारक व्यापार्‍यांची नोंदणी, बँक खाते क्रमांक, विवरणपत्र असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असताना ते दूर करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत.’’ विपुल शहा, व्यापारी.
अधिकार्‍यांची टोलवाटोलवी - पहिल्या टप्प्यात किती व्यापार्‍यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, व्हॅटधारक व्यापार्‍यांच्या यादीची छाननी झाली का, प्रत्यक्ष नोंदणी प्रमाणपत्र कधी देणार याबाबत ए. डी. साबळे व दिनेश गांधी या दोन एलबीटी अधिकार्‍यांकडे विचारणा केली. मात्र, दोघांनाही त्याबाबत काहीच माहिती नव्हती. दोघांनी एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात शंका विचारण्यासाठी येणार्‍या व्यापार्‍यांनाही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. व्यापार्‍यांना बसण्यासाठीही तेथे पुरेशी जागा नाही. या कार्यालयाच्या परिसरात घाण साचली असून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.