आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढा-यांच्‍या गावांतच ग्रामस्वच्छतेचा बोजवारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-तालुक्याचा राजकीय कारभार ज्या आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, इतर संस्थांचे कारभारी चालवतात, भौतिक सुविधांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, अशा सर्वच कारभार्‍यांच्या गावांत हगणदारीमुक्तीचा बोजवारा उडाला आहे. या कारभार्‍यांची अवस्था म्हणजे ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान..’ या उक्तीप्रमाणे दिसून येत आहे.

नगर तालुक्यात एकूण 105 ग्रामपंचायती असून तालुक्याची लोकसंख्या 2 लाख 59 हजार 138 आहे. तालुक्यात 56 हजार 506 कुटुंबसंख्या असून यातील फक्त 29 हजार 811 कुटुंबांकडेच शौचालये आहेत. तालुक्यात 2007 ते 2009 या दोन वर्षांच्या कालावधीत हगणदारीमुक्ती उपक्रमाने चांगला जोर धरला होता. त्यावेळी पिंपळगाव वाघा हे तालुक्यातील पहिले हगणदारीमुक्तगाव ठरले. त्यानंतर नागरदेवळे, बुर्‍हाणनगर, रुईछत्तीसी, कापूरवाडी, घोसपुरी, आठवड, हिवरेझरे, ससेवाडी, जखणगाव, धनगरवाडी, भोयरेपठार, हिवरेबाजार, मांजरसुंबा, रतडगाव, पिंपळगाव लांडगा, हातवळण, कोल्हेवाडी, दशमीगव्हाण, वारूळवाडी, भोयरे खुर्द, डोंगरगण अशी तालुक्यातील या 22 गावांना हगणदारीमुक्तीचे पुरस्कार मिळाले. पण ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या म्हणीप्रमाणे या 22 पैकी हिवरेबाजार, हिवरेझरे आणि धनगरवाडी ही तीनच गावे गाव स्वच्छ ठेवण्यात यशस्वी ठरले. बाकीच्या 18 गावांमधील आजची आकडेवारी धक्कादायक आहे. हातवळण 22 टक्के, घोसपुरी 46 टक्के, रुईछत्तीसी 40 टक्के, रतडगाव 52 टक्के, भोयरेपठार 64 टक्के ही आकडेवारी पहिल्यास हीच ती हगणदारी मुक्त गावे का? असा सवाल उपस्थित होतो. तालुक्यातील 105 पैकी 60 गावांमधील टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. भातोडी, निमगाव वाघा, उदरमल, राळेगण, रांजणी, गुणवडी, हातवळण, इसळक, मठपिंप्री या गावांची टक्केवारी अगदी 25 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. फक्त जखणगाव, मांजरसुंबा, नागरदेवळे, नवनागापूर, पिंपळगाव लांडगा, पिंप्री घुमट या गावांची टक्केवारी 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 100 टक्के हगणदारीमुक्त गावांमध्ये धनगरवाडी, हिवरेबाजार, हिवरेझरे व वाटेफळ ही चारच गावे तालुक्यात आहेत.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांचे सोनेवाडी (मेहकरी) गाव फक्त 27 टक्के हगणदारीमुक्त आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांचे टाकळीकाझी 31 टक्के, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद दळवी यांचे सोनेवाडी (चास) 50 टक्के, बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांचे वाकोडी गाव 68 टक्के, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय मगर यांचे जेऊर गाव 58 टक्के, शिक्षकांचे गाव म्हणून असलेले सारोळा कासार 48 टक्के, दादाभाऊ चितळकर यांचे देऊळगाव सिद्धी 33 टक्के यासह आगडगाव, अरणगाव, अकोळनेर, डोंगरगण या गावांची टक्केवारी कमी आहे.