आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislative Council,Latest News In Divya Marathi

शेलार यांना राजयोगाने दिली पुन्हा हुलकावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे-मागील पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा व पदाचा घास राष्‍ट्रवादीचे जिहाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हातून पुन्हा एकदा निसटला आहे. विधान परिषदेवरील नियुक्तीत संधी डावलली गेल्याने शेलार यांना पुन्हा एकदा राजयोगाने हुलकावणी दिल्याची चर्चा तालुक्यात आहे.
राज्यात राष्‍ट्रवादीतर्फे विधान परिषदेवर नियुक्ती करताना जी नावे चर्चेत होती त्यात शेलार यांचे नाव आघाडीवर होते. ऐनवेळी त्यांना ही संधी डावलली गेली. मागील पंधरा वर्षांपासून ते राष्‍ट्रवादीमध्ये संघटनात्मक पातळीवर काम करीत आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ते जिल्हाध्यक्षपदाचा प्रदीर्घ काळ ते पदभार सांभाळत आहेत. विधान परिषदेवर कोणतीही जागा भरण्याची वेळ आली की, त्यात शेलार यांचे नाव बारा वर्षांपासून हमखास चर्चिले जात आहे. शेवटच्या क्षणी त्यांचे नाव कापले जाण्याची परंपरा यंदाही कायम राहिली.
मुळातच शेलार यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेकदा शेवटच्या क्षणी पदांनी हुलकावणी दिली आहे. श्रीगोंद्यात कोळगाव जिल्हा परिषद गटात 1990 मध्ये ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याकडून ते पराभूत झाले. श्रीगोंदे कारखाना निवडणुकीत दोनदा काठावरून अपयशी झाले. एकदा फक्त एका मताच्या फरकाने विजयी झाले. मात्र, चेअरमनपदाची संधी हाती येतानाच कोर्ट-कचेरीच्या वादात हे पद देखील हुकले. देखरेख संघाच्या निवडणुकीत एका मताने पडले. श्रीगोंदे विधानसभा निवडणुकीत 1994 मध्ये बबनराव पाचपुतेंविरुद्ध त्यांना तिरंगी लढतीत अपयश आले.

1999 ला नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत शेलार यांची जाहीर झालेली भाजपची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून ती दिलीप गांधी यांना मिळाली. तेव्हा शेलारांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. विधान परिषदेवर घेण्याचा शब्द शरद पवारांनी तेव्हा दिला होता. पंधरा वर्षांत अशी आश्वासने अनेकदा मिळाली. परंतु आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी साई संस्थानचे उपाध्यक्षपद चालून आले. मात्र, ही नियुक्ती न्यायालयात वादात अडकली व हे पद देखील हुकले. यंदाही लोकसभेसाठी शेलारांचे नाव चर्चेत होते. उमेदवारी मिळाली नाहीच. ही सर्व राजकीय फरफट पाहता शेलारांचे निकटवर्तीय आता त्यांना निर्वाणीचा निर्णय घेण्याचा आग्रह धरत असल्याचे खात्रीलायक समजते.

दरम्यान, शेलार यांनी राष्‍ट्रवादीच्या चिंतन बैठकीकडे देखील पाठ फिरवल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींना नाराजीचा संदेश देखील दिला. विशेष म्हणजे शेलार यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.