आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोले तालुक्यात बिबट्याच्या बछड्याचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खाद्याच्या व पाण्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेल्या बिबट्याच्या बछड्यास दोन कुत्र्यांनी आपले भक्ष्य बनवले. ही घटना पाहणार्‍या काही नागरिकांनी बछड्यास सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला हा बछडा गतप्राण झाला. ही घटना शुक्रवारी (15 मार्च) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील देवठाण येथे घडली. वनखात्याने गुप्तता पाळून मृत बछड्यावर अंत्यसंस्कार केले.

देवठाणच्या उत्तरेकडील शिवारात सुमारे 100 एकर क्षेत्रावर घोडी जंगल आहे. आढळा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे या भागात अनेक हिंस्त्र पशुंचे वास्तव्य आहे. त्यात बिबट्यांची संख्या बर्‍यापैकी आहे. या जंगलातून बिबट्याचे मादी जातीचे सुमारे दीड-दोन महिने वयाचा एक बछडा आढळा उजव्या कालव्याच्या बाजूने शहरी वस्तीत आले. दोन कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. एरव्ही कुत्र्यांच्या मागे लागणार्‍या बिबट्याच्या मागे कुत्रे धावले.

त्यांनी त्यास गंभीररित्या जखमी केले. प्रा. परशराम काकडे व अन्य ग्रामस्थांनी बछड्यास वाचवण्यासाठी कुत्र्यांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. औषधोपचार मिळण्यापूर्वीच बछडे मरण पावले. वनपाल एम. बी. जोग व वनरक्षक एस. बी. अडागळे यांनी घटनेची माहिती वन कर्मचारी देवरे यांना दिली. पशुवैद्यकीय आयुक्तालयाचे डॉ. एल. बी. भांगरे यांनी शवविच्छेदन केले. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.


वनकर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद
सुगाव रोपवाटिकेत मृत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनकर्मचार्‍यांनी ही घटना प्रसारमाध्यमांपासून दडवून ठेवली. उपविभागीय वनसंरक्षक शिवाजी फटांगरे यांनाही या घटनेबाबत माहिती नसल्याने वनकर्मचार्‍यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त झाला.


कळवले नाही
अकोले वनविभागाचे कर्मचारी देवरे यांना बछड्याच्या मृत्यूबाबतचा अहवाल शुक्रवारीच सादर केला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना मी स्वत: कळवले नाही. पंचनामा करुन डॉ. एल. बी. भांगरे यांनी शवचिकित्सा केली. नंतर सुगाव रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले.’’ एम. बी. जोग, वनपाल , देवठाण.


चौकशी करणार
असे काही घडले असल्यास मी चौकशी करुन कळवतो. वनकर्मचार्‍यांनी परस्पर काही निर्णय घेतला असेल तर त्याचीही चौकशी होईल. शिवाजी फटांगरे, उपविभागीय वन अधिकारी, संगमनेर.