आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-मनमाड रस्त्यावर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आमराईत रस्त्याच्या कडेला सोमवारी सकाळी प्रौढ नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याला पाहण्यासाठी नागरिक वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती.

अकराच्या सुमारास वनखात्याचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यावर या बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी या ठिकाणाहून राहुरी तालुक्यातील डिग्रसच्या रोपवाटिकेत हलवण्यात आले. याबाबत काही जणांनी नगरला निसर्गमित्र मंदार साबळे यांच्याशी संपर्क साधला. साबळे यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन या बिबट्याची पाहणी केली. हा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या आकाराने एकदम मोठा होता. या बिबट्याचा मृत्यू शनिवारी रात्री वाहनाची धडक बसून झाला असण्याची शक्यता पशुवैद्य डॉ. विजय धिमटे यांनी व्यक्त केली. तो आमराईत पडून असल्याने ही बाब त्या दिवशी कुणाच्या लक्षात आली नसावी. सोमवारी सकाळी काहीजणांना हा मृतावस्थेतील बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. रात्री रस्ता ओलांडत असताना या बिबट्यास वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्याच्या उजव्या बाजूस मार लागला. धडक एवढी जोराची होती की, त्याच्या बरगड्या तुटल्या, तसेच उजव्या पायाचा पंजाचे हाड मोडले. मोठ्या प्रमाणावर अंतर्गत रक्तस्राव झाल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निदान डॉ. धिमटे यांनी केले. या बिबट्याच्या अंगावर आधीच्या काही जखमांचे वाळलेले व्रण होते. त्यावरून त्या बिबट्याची एखाद्या दुसऱ्या नर बिबट्याशी झुंज झाली असण्याची शक्यता आहे.
शव विच्छेदनानंतर बिबट्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. यावेळी वनपाल सी. के. गाडे, वनरक्षक पी. के. वारुंगसे वनकर्मचारी उपस्थित होते.

वन्यजीवांकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातवन्यजीवांची संख्या समाधानकारक असून, नगरला वन्यजीव विभाग नसल्याने अशा वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागात उदासीनता पहायला मिळते. वन्यप्राणी जखमी झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्याची कुठलीही व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांना हे प्राणी योग्य पद्धतीने हाताळण्याचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना प्राणास मुकावे लागते. हे प्राणी जरी नगरच्या किंवा तालुका पातळीवरील शासकीय पशुचिकित्सालयात उपचारासाठी नेले, तरी तेथील पशुवैद्यांना वन्यजीवांच्या हाताळणीची माहिती नसते. वन्यप्राणी हाताळणीत फरक असल्याने उपचार करूनही हे प्राणी वाचू शकत नाहीत.

कृषी विद्यापीठाजवळ वाहनाची धडक बसून मरण पावलेल्या बिबट्याची सोमवारी पाहणी करताना पशुवैद्य डॉ. विजय धिमटे वनकर्मचारी. छायाचित्र: मंदार साबळे
गलथानपणा