आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांच्या मुलीला केले बिबट्याने भक्ष्य, शोधाशोध करूनही शरीराचे अवशेष सापडले नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर (जि. नगर) - अवघ्या आठ दिवसांची चिमुकली बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे घडली. वनखात्याने व ग्रामस्थांनी दिवसभर शोधाशोध करूनही तिच्या शरीराचे अवशेष सापडू शकले नाहीत.
खंडोबा मंदिरामागे असलेल्या कोटकर वस्तीवर कोटकर कुटुंबिय राहतात. मंगळवारी पहाटे सुदाम भीमा कोटकर यांची पत्नी प्रात:विधीसाठी घराबाहेर गेली. घराचे दार उघडेच होते. घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही क्षणातच घरात प्रवेश करत आठ दिवसांपूर्वी जन्मलेल्या बालिकेला तोंडात पकडून जंगलात नेले. काही अंतरावर असलेल्या सुदाम यांनी हा प्रकार पाहिला. शंका आल्याने त्यांनी घरात येऊन पाहणी केली असता चिमुकली जागेवर नव्हती. त्यामुळे त्यांनी मुुलीला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने टाहो फोडला. त्यामुळे वस्तीवरील लोकांनीही तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. परिसरातील नागरिकांनी दिवसभर बिबट्या व बालिकेचा शोध घेतला, मात्र तपास लागू शकला नाही.
या घटनेचा जबर धक्का बालिकेच्या माता-पित्यांना बसला आहे. वनखात्याच्या अधिका-यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.