राहुरी - धानोरे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या सुभाष भाऊसाहेब दिघे याच्या मालकीच्या विहिरीत पडला. सकाळी आठ वाजता मादी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले.
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीत टाकण्यात आला. तथापि, बिबट्याची पिंजऱ्यापर्यंत झेप अपुरी पडली. नाका-तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचे प्राण गेले. विहिरीत कचरा पाणी जास्त असल्याने बिबट्या थकला होता. शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर डिग्रस येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वन कर्मचारी एस. एम. किनकर, एस. आर. धनवट, एम. डी. हारदे, एस. एम. गायकवाड उपस्थित होते.