आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी केली मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- मेहेंदुरी शिवारात झाडाखाली पडलेले आंबे गोळा करणार्‍या दहा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. तिच्या वडिलांनी प्रसंगावधान राखून धिरोदात्तपणे मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. यात मुलगी गंभीर जखमी झाली. अश्विनी बंडू उघडे (10, म्हाळादेवी, ता. अकोले) असे या मुलीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता घडली.
सुनील मालुंजकर यांच्या उसाच्या शेताजवळ असलेल्या झाडाखाली पडलेले आंबे अश्विनी गोळा करत असताना शेतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. अश्विनीने आरडाओरडा केल्याने तिचे वडील बंडू यांनी लाकडी दांडक्याने बिबट्यावर प्रहार केला. त्यामुळे बिबट्याने अश्विनीला सोडून शेतात धूम ठोकली. शेजारच्या शेतकर्‍यांनी डबड्यांचा आवाज करून उसातील बिबट्याला दूर हुसकावले. अश्विनीच्या मांडीला मोठी जखम झाली असून सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते.प्रथमोपचार करून तिला अकोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असून जिविताला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रवराकाठावरील रुंभोडी, इंदोरी, बहिरवाडी, मेहेंदुरी, उंचखडक, अकोले, विठे, चितळवेढे, निंब्रळ, म्हाळादेवी, निळवंडे परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. रुंभोडी-इंदोरी परिसरात सलग तिसर्‍या दिवशी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात सुमारे 8 ते 10 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. वनविभागाने पिंर्ज‍यांची संख्या वाढवली असून पाच ठिकाणी पिंजरे लावले आहेत.