आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिल्लांसह बिबट्याचे काष्टी शिवारात दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्यातील काष्टी परिसरात दोन पिल्लांसह बिबट्याने दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावून पकडावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

काष्टी शिवारात बंडू गुलाबराव चितळकर यांची जमीन आहे. तेथे सध्या ऊस आहे. शेजारीही मोठ्या प्रमाणात ऊस आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान बिबट्याच्या दोन पिल्लांनी दर्शन दिले. तेथे उपस्थित असणा-या अतुल खेडकर, विकास पोंद्कुले, रामभाऊ चितळकर, बापू कोकरे, सोमनाथ भंडारी व पंडित खेडकर तरुणांनी या दोन पिल्लांना पकडले. त्याचवेळी शेजारच्या उसातून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्याने हे तरुण त्या पिल्लांना सोडून पळून गेले.

काही वेळातच त्याठिकाणी बिबट्या आपल्या मादीसह आला व आपल्या दोन पिल्लांना घेऊन पसार झाला. काष्टी परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने काष्टी शिवारातील गावे अन् वाड्या- वस्त्यांवर दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी बिबट्याची पिल्ले आढळल्याचे काही तरुणांनी सांगितले. त्यानुसार दौंड विभागातील वन अधिका-यांच्या सूचनेवरून वनरक्षक खरात यांच्यासह कर्मचा-यांनी पिल्ले आढळून आलेल्या ठिकाणी भेट दिली. तेथे दोन बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. दरम्यान, या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बुधवारी पिंजरे लावण्यात येणार आहेत, असे दौंड विभागाचे वनक्षेत्रपाल एस. एन. गायकवाड यांनी सांगितले.