आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणराजाची विश्रांती; शेतकरी वर्ग चिंतेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 35 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 60 टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. पाऊस थांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

नगर जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 497 मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी 1 जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. त्यामुळे खरीप हंगाम संकटात आला. पावसाने दडी मारल्याने 8 जुलैपर्यंत अवघ्या 3 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. 23 जुलैपर्यंत हा आकडा 14 टक्क्यांवर गेला. 30 जुलै अखेरपर्यंत 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 60 टक्के पेरण्या झाल्या होत्या.

जुलैच्या अखेरच्या दिवशी मान्सूनच्या पावसाला ख-या अर्थाने सुरुवात झाली होती. पण अकोले वगळता अन्यत्र समाधानकारक पाऊस झाला नाही. शेतक-यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद अकोले तालुक्यात झाली आहे. रविवारी अकोले वगळता अन्य भागांत पावसाने विश्रांती घेतली. गेल्या 24 तासांत फक्त 23.93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात अकोले (22), नगर (4.2) व संगमनेर (5) या तालुक्यांत केवळ पाऊस झाला आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे व जामखेडमध्ये बुधवारपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे पेरण्याही थांबल्या आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात अवघ्या 35 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

6 लाख नागरिकांना टँकरचे पाणी
टँकरची मागणी अजून कमी झालेली नाही. जिल्ह्यात सध्या 349 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील 281 गावे व 1301 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तब्बल 6 लाख 65 हजार नागरिकांना टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी (73) व पारनेर (57 ) तालुक्यात सुरू आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एकूण पाऊस मिमीमध्ये
तालुका 2013 2014
०अकोले 472 315
०संगमनेर 242 48
०कोपरगाव 256 97
०श्रीरामपूर 280 151
०राहुरी 232 104
०नेवासे 242 102
०राहाता 333 90
०नगर 289 141
०शेवगाव 349 123
०पाथर्डी 282 145
०पारनेर 288 49
०कर्जत 353 86
०श्रीगोंदे 309 68
०जामखेड 347 145