आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Let Claim Reservation Of Dhangars, Demand Of Anna Dange

धनगर समाजाला हक्काचे आरक्षण द्या, धनगर महासंघाचे संस्थापक अण्णा डांगे यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दलितसमाजाच्या ३२ संघटना आहेत. पण कुठेही दलितांवर अन्याय झाला की, या संघटना लगेच एकत्र येतात. धनगर समाजाचे असे का होत नाही ? आदिवासींचे आरक्षण आम्हाला नको आहे. त्यांना त्यांचे ठेवून आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे. भटके म्हणून धनगर समाजाला राज्याच्या सवलती मिळतात, पण केंद्राच्या सवलती मिळत नाहीत. एका ओळीच्या घटनादुरुस्ती अभावी हे आरक्षण रखडले आहे. धनगर समाज संघटित नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असा आरोप धनगर महासंघाचे संस्थापक माजी मंत्री अण्ण डांगे यांनी केला.

डांगे यांनी नुकतीच दैनिक दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. धनगर आरक्षणासह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. डांगे म्हणाले, धनगर समाजाची वृत्ती ही देण्याची आहे, घेण्याची नाही. १९९३ पासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला जात आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या भूमिकेला आमचा विरोध नाही. त्यांचा मतदारसंघ हा आदिवासी असल्याने त्यांना मतासाठी आदिवासींबरोबर रहावेच लागेल. आमची भूमीका आदिवासींचे आरक्षण कायम ठेवून आम्हाला वेगळे आरक्षण द्यावे, अशी आहे. आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारने आरक्षणासाठी केवळ केंद्राकडे शिफारस करायची आहे. धनगर समाज एकत्रित संघटित नसल्यामुळे त्याचा फायदा काही लोक घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पोलिस चोरांचे संगनमत झाल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारी केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात वाढली आहे. सरकारचे नियंत्रण राहिले नसल्याने हे द्योतक आहे. अनेक मंत्र्यांना अजून आपल्याकडील खात्याची माहितीही झालेली नाही, असे डांगे म्हणाले.

सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहविभागावर केलेल्या टीकेबाबत डांगे म्हणाले, मंत्र्यांनी आपल्या पक्षातील अन्य मंत्र्यांच्या विभागांवर टीका करू नये, हा नियम आहे. नियम पाळता येत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावर यावे. राजकीय अज्ञान असलेले लोक अशी टीका करतात, असा टोला डांगे यांनी लगावला. मागील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्याची चीड जनतेमध्ये होती. त्यामुळे देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली, असे डांगे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी अस्वस्थ नाही. या पक्षात मी सुखी आहे. निवडणुकीच्या काळातच भाजपकडून मला बोलावणे आले होते. जायचे असते तर तेव्हाच गेलो असतो, असे डांगे म्हणाले.
डांगे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीका केली, तरी त्यांचे निकटवर्तीय असलेले सध्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना सावरण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी सर्व ठीक करता येईल, अशी जादूची कांडी काही सरकारकडे नाही. गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ हे प्रश्न सरकारपुढे आहेत. निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा लगेचच पूर्ण होतात असे नाही. सरकारपुढे अनेक अडचणी आहेत. टोल रद्द, एलबीटी रद्द या निर्णयांमुळे मोठे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. भाजपमध्ये असताना मीच कर्जमुक्तीचे आंदोलन सुरु केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशात कर्जमाफी केली. आताही एफआरपीनुसार ऊसउत्पादक शेतकऱ्यांना भाव देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पंढरपूर देवस्थानचा राजीनामा
पंढरपूरदेवस्थान कमेटीचा मी स्वत:हून राजीनामा दिला. देवस्थान कमेटीकडून कधीही मी भत्ते घेतले नाहीत, वाहन घेतले नाही आणि दुसऱ्यांना घेऊ दिले नाही. त्यामुळे काही लोक नाराज झाले. मी स्वत: ही कमेटी बरखास्त करण्याची मागणी केली होती. पंढरपूरच्या विकासासाठी केंद्राने विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. प्राधिकरणाने विकासाचे नियोजन केले आहे. शिर्डी, सिध्दिविनायक देवस्थान, तिरुपती यांना सुविधा मिळू शकतात, मग पंढरपूरला का नाही ? पंढरपूरच्या यात्रेनंतर निम्मे पंढरपूर दवाखान्यात असते, असे डांगे यांनी सांगितले.

खाते समजत नाही, पण पैसे कसे समजतात ?
फडणवीसएकनाथ खडसे वगळता भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्र्यांना अनुभव कमी आहे. फडणवीस यापूर्वी महापौर होते, तर खडसे मंत्री होते. त्यामुळे ते चांगले काम करत आहेत. तथापि, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अजूनही आपले खाते समजलेले नाही. मंत्र्यांना खाते समजत नसेल, नुसते पैसे समजत असतील, तर काय करायचे ? अशी टीका युती सरकारमध्ये पूर्वी मंत्री असलेले अण्णा डांगे यांनी केली.

पंकजा मुंडे ही माझ्या मित्राची मुलगी...
बहुचर्चित चिक्की घोटाळ्यावरुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत डांगे म्हणाले, चिक्कीत कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. हे सर्व बनावट आहे. पंकजा ही माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. ती चुकली असेल, तर आम्ही ती चुकलीच असे म्हणू. तथापि, घरगुती कारणातून या घोटाळ्याची चर्चा प्रसारमाध्यमात रंगवली जात आहे.'' अण्णाडांगे, माजीमंत्री.