आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरला उद्यानांचे शहर बनवुया...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक शहरांच्या रचनेत बागा व हिरवाईला महत्त्व आहे. युरोप व अमेरिकेतील बागा मैलोनमैल लांबीच्या असतात. मॉस्कोत अशा अनेक बागा आहेत. बंगळुरू हे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोलकातातील बॉटनिकल पार्क फिरण्यासाठी तीन तासही पुरत नाहीत. मोकळ्या जागा व बागा ही शहराची फुप्फुसे असतात. ती सक्षम असणे गरजेचे आहे. तो नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तशीच जबाबदारीही. हे सर्व सांगण्याचे कारण हेच की, शहरांच्या रचनेत बागांचे महत्त्व हे अशा प्रकारचे आहे. आपल्याकडे कशी स्थिती आहे? उंच पठारावरील आरोग्यदायी जागा म्हणून निजामशहाने हे शहर वसवले. निजामशाहीत येथे अनेक उद्याने व इमारती होत्या. सध्याच्या शहरात महापालिकेच्या नोंदीनुसार कागदोपत्री ५२ उद्याने आहेत. वास्तवात मात्र जुनी असलेली सिद्धिबाग, नव्याने बनवण्यात आलेले गंगा व महालक्ष्मी ही उद्याने वगळता नगरमध्ये नाव घेता येईल अशी उद्याने नाहीत. सुदैवाची बाब म्हणजे लष्कराने मात्र मोठ्या प्रमाणावर हिरवाई फुलवली आहे. आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलने त्यांच्या भागात लहान-मोठी ३० उद्याने फुलवली आहेत. त्यांची काटेकोर देखभालही ते करत असल्याने हा परिसर वर्षभर हिरवा असतो. एसीसीएसनेच भिंगारनाल्याच्या पाण्यावर फुलवलेले भिंगार नाला पार्क नगरकरांसाठी विरंगुळ्याचे व व्यायामाचे हक्काचे ठिकाण झाले आहे. मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरनेही (एमआयआरसी) ‘एमआयआरसी ग्रीन’नावाने सुमारे १२५ एकरांचे जंगल उभे केले आहे. लष्करी विभागांत असलेल्या हिरवाईमुळे या भागांत मुख्य शहरापेक्षा दोन अंशांनी तापमान कमी असते.

महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही मनावर घेतले, तर कागदोपत्री असलेली ही उद्याने प्रत्यक्षात येऊन नगर हे उद्यानांचे शहर बनू शकते. ‘दिव्य मराठी’ने यासाठी हे अभियान सुरू केले आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल. नगरकरही त्यात सहभागी होतील, असा विश्वास वाटतो. चला, तर आपण नगर शहर हरित व सुंदर बनवू या...