आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत ३३ जणांनी गमावले अपघातात प्राण, वाहने धडकल्याने अनेक दुभाजक फुटलेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गांवर मोठी वर्दळ असते. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील दुभाजकांवर लाईटकटर नसल्यामुळे रात्री अंधारात दुभाजकावर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्तपणे शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने अप्रशिक्षित चालकांच्या निर्धास्तपणामुळे जानेवारी ते एप्रिल या कालावधीत झालेल्या ५९ अपघातांत ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

नगर हे राज्यातील मध्यवर्ती शहर असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही नगरला म्हटले जाते. नाशिक, पुणे, मुंबई औरंगाबाद या महानगरांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रहदारी नगरच्या रस्त्यांवर असते. त्यातच नगर-औरंगाबाद नगर-मनमाड या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या दोन्ही मार्गांचे चौपदरीकरण झाले असून दुभाजक बसवण्यात आले आहेत. औरंगाबाद मार्गावरील दुभाजकांवर लाईटकटर पॅनेल बसवण्यात आले होते. परंतु अनेक ठिकाणी हे पॅनेल चोरीस गेले आहेत. त्यामुळे रात्री उजव्या बाजूकडून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाशझोत वाहनचालकाला त्रासदायी ठरतो.
शहरातील डीएसपी चौक ते शेंडीपर्यंतच्या रस्त्याची सोमवारी ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली असता, अनेक ठिकाणचे लाईटकटर पॅनेल गायब झाल्याचे आढळून आले. हे पॅनेल नसल्याने वाहने दुभाजकांवर आदळून अपघात होतात. असलेले दुभाजकही अनेक ठिकाणी फुटल्याचे आढळून आले. संबंधित ठेकेदार एजन्सीने तातडीने याकडे लक्ष देऊन आवश्यक तेथे लाईटकटर बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली.
शहरांतर्गत मार्गांवरून सकाळी नऊ ते बारा या वेळेत अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि, बेशिस्तपणे ही वाहने सकाळी शहरात प्रवेश करत असल्याने अनेकदा अपघात होतात. अवजड वाहतुकीचा बेशिस्तपणाच त्यास कारणीभूत ठरत आहे. सकाळी शालेय विद्यार्थी, नोकरदार यांची वर्दळ असते. कोतवाली, एमआयडीसी, तोफखाना ठाण्यांमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ५९ अपघातांची नोंद असून ३३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चौपदरी रस्ता असताना अवजड वाहनांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला चालणे अपेक्षित आहे. पण अप्रशिक्षित चालक ही वाहने दुभाजकाच्या कडेने चालवत असल्याने बऱ्याचदा ताबा सुटून दुभाजकांवर आदळून मोठे अपघातही झाले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अपघाताची कारणे ...
बातम्या आणखी आहेत...