आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने नगरला झोडपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सलग सातव्या दिवशी जोरदार पावसाने नगर शहराला झोडपून काढले. केडगाव, सावेडी, नागापूर व भिंगार परिसरात बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. हदवसभरात ३१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली आहे. मागील आठवड्यात ३३० टँकर सुरू होते. ही संख्या आता २८० वर आली आहे. पाणलोटक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे विविध धरणांतील पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे.
यंदा उशिरा म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली. मागील गुरुवारपासून सलग सुरू असलेला पाऊस अजून कायम आहे. बुधवारी सकाळपासून आकाश ढगा‌ळ होते. दुपारी अडीचच्या सुमारास प्रारंभी केडगावमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नगर शहर कोरडे होते. केडगावातील पाऊस थांबल्यानंतर शहरात सलग दीड तास पाऊस कोसळत होता. अनेक भागातील रस्त्यांवर, तसेच चौकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दिल्ली दरवाजा, चौपाटी कारंजा, माळीवाडा, नालेगाव, कोठी, चांदणी चौक या भागात नेहमीप्रमाणे पाण्याची डबकी साचली होती. शहरात बुधवार अखेरपर्यंत २५७.३८ िमलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, काही भागात पावसाने नुकसानही झाले. पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या आठवड्यात ३३० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पावसामुळे ५० टँकर बंद झाले आहेत. तथापि, अजूनही ४ लाख ९६ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाथर्डी, कर्जत व नगर तालुक्यात अजून पाणीटंचाई आहे. पाथर्डीत ५२, कर्जतला ४४ व नगरला ३९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.भंडारदरा धरणात बुधवारी १०,९३५, मुळा धरणात २०,२०३, तर निळवंडे धरणात ६,१६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
गेल्या २४ तासांत झालेला पाऊस
गेल्या २४ तासांत राहुरी तालुक्यात सर्वािधक ४२.४ मिलिमीटर पाऊस झाला. संगमनेर येथे ९, अकोले १, कोपरगाव ३३, नेवासे १, पारनेर १३, नगर ३२, शेवगाव १२, पाथर्डी १६, कर्जत २ व जामखेड येथे ६.२मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३३१ मिलिमीटर पाऊस झाला होता.

बुधवार अखेरपर्यंत नगर २७४, अकोले ५५९, संगमनेर ३१५, कोपरगाव २०८, श्रीरामपूर ४३२, राहुरी २११, नेवासे १७४, राहाता २३३, शेवगाव २३२, पाथर्डी २८९, पारनेर ८६, कर्जत १९२, श्रीगोंदे १२९ व जामखेडमध्ये २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.