आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Limaye Wada Collapsed Municipal Corporation Shabbily Behavior

मनपाचा गलथानपणा; लिमये वाडा कोसळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता बसल्या जागी बांधकामाला परवानगी देणे, हा महापालिकेच्या नगररचना विभागाचा तसा जुनाच कारभार. त्यामुळे हा विभाग बदनाम आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो, याचे उदाहरण दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा समोर आले. देशमुख गल्लीत प्रत्यक्ष पाहणी न करता चुकीच्या पध्दतीने बांधकामाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे हे बांधकाम सुरू असतानाच शेजारचा वाडा कोसळला. वाड्यात राहणारे सहाजणांचे लिमये कुटुंब या घटनेत मरता मरता वाचले. दुर्दैवाची बाब अशी की, शेजारच्या खोदाईमुळे वाडा कोसळण्याची भीती असल्याची तक्रार या कुटुंबाने नगररचना विभागाकडे दोन महिन्यांपूर्वीच केली होती. त्याची दखल न घेतल्यामुळे या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

साडेचार लाख लोकसंख्येच्या नगर शहरात 92 हजार मालमत्तांची अधिकृत नोंद आहे. प्रत्यक्षात मालमत्तांची संख्या दीड लाखापर्यंत पोहोचली आहे. नगररचना विभागाच्या ‘चिरीमिरी’च्या कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या पध्दतीने बांधकाम परवानगी व पूर्णत्वाचा दाखला हवा असेल, तर पैसे मोजा, असा या विभागाचा कारभार आहे. त्याचा आतापर्यंत अनेकांना फटका बसला. देशमुख गल्लीतील मोहन बेदरे यांच्या बांधकामालाही अशाच चुकीच्या पध्दतीने परवानगी देण्यात आली.


बेदरे यांनी सुरू केलेल्या बांधकामाशेजारीच अनिल लिमये यांचा जुना वाडा आहे. नगररचना विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी न करताच बेदरे यांना बांधकाम परवानगी दिली. बेदरे यांनी बांधकामासाठी वाड्याच्या शेजारी 10 ते 15 फूट खोल खोदकाम केल्याने लिमये यांच्या वाड्याच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले. त्यामुळे घाबरलेल्या लिमये कुटुंबाने नगररचना विभागाकडे धाव घेतली. शेजारच्या बांधकामामुळे वाडा कोसळण्याची भीती आहे, अशी रीतसर तक्रार त्यांनी दिली. परंतु दोन महिने उलटले, तरी या विभागाने लिमये यांच्या तक्रारीबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही.

अखेर लिमये कुटुंबाने महापालिकेला वकिलामार्फत नोटीसही पाठवली, तरी नगररचना विभाग जागचा हलला नाही. शेवटी जे व्हायचे तेच झाले. बुधवारी (5 फेब्रुवारी) दुपारी हा वाडा कोसळून लिमये कुटुंब पूर्णपणे निर्वासित झाले. ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळी कुटुंबातील 6 सदस्य वाड्यात होते. वाडा कोसळत असल्याचे पाहून ते कसेबसे बाहेर पडले, म्हणून त्यांचा जीव वाचला. शेजारी बांधकाम करत असलेल्या 10-12 मजुरांनीदेखील आपला जीव वाचवला. नगररचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लिमये कुटुंबावर जीवघेणा प्रसंग ओढवला. यापूर्वीही शहरात अशा अनेक घटना घडल्या, तरी या विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही.

लिमये कुटुंबावर निर्वासित होण्याची वेळ आली, शिवाय राहता वाडा कोसळल्याने सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. नगररचना विभागाने वेळीच दखल घेतली असती, तर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला नसता.

तर परवानगी रद्द करू
लिमये यांनी शेजारच्या बांधकामाबाबत तक्रारअर्ज दिलेला आहे. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. बांधकाम चुकीचे असेल, तर वेळप्रसंगी त्याची परवानगी रद्द करू. चौकशी अहवाल आल्यानंतर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल.’’ विश्वनाथ दहे, नगररचना अधिकारी.

लिमये कुटुंबाचा पाठपुरावा
बांधकाम थांबवण्यासाठी मनपा आयुक्तांना अर्ज - 20 डिसेंबर 2013
अर्जाची दखल न घेतल्याने वकिलामार्फत नोटीस - 29 जानेवारी 2014
वाडा पडण्याच्या शक्यतेबाबत पोलिसांकडे तक्रार - 3 फेब्रुवारी 2014
वाडा पडल्यानंतर आयुक्त व जिल्हाधिकारी अर्ज - 5 फेब्रुवारी 2014

नुकसानीस नगररचनाच जबाबदार
पाचशे चौरस फुटांच्या जागेची मालकी बेदरे यांच्याकडे नसतानादेखील नगररचना विभागाने त्यांना या जागेचा एफएसआय दिला. यासंदर्भात मी नगररचनाकार विश्वनाथ दहे व गणेश क्याथम यांच्याकडे लेखी तक्रार दिली. शिवाय अनेकदा पाठपुरावा करून हे बेकायदा बांधकाम थांबवण्याची मागणी केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाडा कोसळून झालेल्या नुकसानीस नगररचना विभागाच जबाबदार आहे.’’ अनिल लिमये, सदस्य, लिमये कुटुंब.