आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणाली बंद असल्याने शिष्यवृत्ती रखडली; अधिकाऱ्यावर शाई...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सामाजिक न्याय विभागाने परराज्य शिष्यवृत्ती प्रणालीसाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ मागील पाच ते सहा महिन्यांपासून बंद असल्याने ऑनलाइन शिष्यवृत्तीची प्रकरणे रखडली आहे. अंमलजबावणी यंत्रणा असलेल्या सहाय्यक समाजकल्याण आयुक्त कार्यालय यंत्रणेतील त्रुटींमुळे रोष सहन करण्याची नामुष्की शनिवारी ओढवली. चर्मकार उठाव संघाच्या कार्यकर्त्यांनी सहायक समाजकल्याण आयुक्तांच्या अंगावर शाई फेकून आंदोलन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

सामाजिक न्याय विभागामार्फत वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परराज्यात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारच्या धोरणानुसार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. यासाठी शासनाने नेमलेल्या महा इस्कॉल संकेत स्थळावर अर्ज मागवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज दाखल केले. हे अर्ज दाखल केल्यानंतर प्राचार्यांच्या लॉगीनमार्फत संबंधित लिपिक तसेच सहायक समाजकल्याण आयुक्तांकडे येतात. अर्ज मंजुरीनंतर त्या रकमेचे बिल कोषागार कार्यालयाकडे पाठवले जाते. त्यानंतर आलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून संकेतस्थळच बंद असल्याने अनेक अर्ज या प्रणालीत अडकून पडले होते. शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रियाच ठप्प झाल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. 

 

चर्मकार उठाव संघाच्या वतीने शनिवारी समाजकल्याण आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. नेवासे तालुक्यातील तरवडी येथील सूरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याचे शिक्षण लोकवर्गणीतून झाले. या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु, वेळोवेळी पाठपुरावा करूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर चर्मकार उठाव संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता. सूरजला बारावी पास झाल्यानंतर जयपूर येथे पुढील शिक्षणासाठी पात्र ठरला होता. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने तो तेथे प्रवेश घेऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा त्याला कर्नाटक राज्यात संधी उपलब्ध झाले. तेथेही त्याला प्रवेश मिळू शकला नाही. दीड वर्षापासून तो आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु त्याला शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. या विद्यार्थ्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलंबित आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. शनिवारी सर्व्हर बंद असल्याबाबतची अडचण सहायक समाजकल्याण आयुक्त वाबळे यांनी आंदोलकांना सांगितली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी त्यांच्या चेहऱ्यावर अंगावर शाई फेकली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

 

अशी घडली घटना 
चर्मकारउठाव संघाचा मोर्चा आल्यानंतर सहायक समाज कल्याण आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी ऑनलाइन देयक प्रणाली डिसेंबरपासून सुरू आहे. पण सुटी असल्याने दोन तासांत बिल कोषागार कार्यालयास सादर करतो असे सांगितले. त्यावर आंदोलकांनी कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाच्या खाली येण्याची विनंती केली. त्यानुसार खाली गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाबळे यांच्या अंगावर शाई फेकली. 

 

प्रणालीत अडकला अर्ज 
संबंधित विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, मे महिन्यापासून प्रणाली बंद पडली. त्यामुळे हा अर्ज प्रणालीत अडकून पडल्याने कार्यवाही करता येत नव्हती. गरज ओळखून आम्ही ऑफलाइन बिल कोषागार कार्यालयाला सादर केले. पण तेथे हरकत घेण्यात आली. आंदोलकांना ही बाब समजावून सांगितली. त्यानंतर मला खाली बोलावून शाई फेकली. - पांडुरंग वाबळे, सहायक आयुक्त. 

 

चार जणांना केली अटक 
अशोकनाथा कानडे (४७, रा. सावेडी, नगर), प्रकाश मोहन पोटे (३२, रा. निंबोडी, नगर), लखन भाऊसाहेब साळे (२४, अकोळनेर, ता. नगर.), विजय जगन्नाथ घासे (३५ केडगाव, नगर) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर जालिंदर रखमाजी केदार (केडगाव) फरार झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...