आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ भूकंपग्रस्तांना लायन्स क्लब देणार साहित्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. नगर शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनने पाचशे भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लबच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत ट्रकभर संसारोपयोगी साहित्य नेपाळला पाठवण्यात येणार आहे.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. शहरासह ग्रामीण भागातही क्लबच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जातो. नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून क्लबने तेथील पाचशे कुटुंबांना ४७ संसारोपयोगी वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे अडीच हजार रुपयांचे साहित्य एका कुटुंबाला देण्यात येणार आहे. त्यात भांड्यांसह डाळ, साखर, तांदूळ, तेल, दूध पावडर, मीठ, ब्लँकेट, औषधे आदीं वस्तूंचा समावेश असेल. लायन्स क्लब ऑफ काठमांडू मिडटाऊनच्या माध्यमातून ही मदत संबंधित कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येईल. क्लबचे पदाधिकारी किरण भंडारी, हरजितसिंग वधवा, सुनील छाजेड ही मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. क्लबच्या या मदतीमुळे नेपाळवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. भूकंपामुळे उघड्यावर पडलेले संसार पुन्हा फुलणार आहेत. लायन्स क्लबप्रमाणेच अन्य काही सामाजिक संस्था, राजकीय पक्ष संघटना, तसेच दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत भूकंपग्रस्तांना दिली आहे.

मानवता हाच धर्म
नेपाळ हा आपला शेजारी देश आहे. या देशावर मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. हजारो कुटुंबे उद््ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत शेजारी म्हणून मदत करणे हा मानवता धर्म आहे. लायन्स क्लबने हा धर्म पाळून मदतीचा हात दिला आहे. या मदतीमुळे तेथील भूकंपग्रस्त कुटुंबे पुन्हा उभी राहिली, तर त्यापेक्षा मोठे समाधान काय असेल...'' किरण भंडारी, अध्यक्ष,लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन.

औषधांची गरज
नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी औषधांची मोठी मागणी आहे. तेथील लायन्स क्लब ऑफ काठमांडू मिडटाऊनच्या मागणीनुसार आवश्यक ते साहित्य पाठवण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत ट्रकभरून साहित्य पाठवण्यात येईल. एका कुटुंबाला संसारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंचा त्यात समावेश असेल..'' हरजितसिंग वधवा, सचिव,लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन.