आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

अर्ज भरण्यापूर्वीच घोलपांचा पत्ता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले बबनराव घोलप यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच पत्ता कट झाला आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांना शुक्रवारी तीन वर्षांची शिक्षा झाली अन् शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या त्यांच्या मनसुबा व तयारीवर पाणी फेरले गेले. या प्रकाराने शिवसैनिक आणखी त्वेषाने निवडणुकीत काम करतील, असे शिवसेनेच्या स्थानिक नेते व पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या काँग्रेसप्रवेशाचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटले. संगमनेरमध्ये त्यांच्यावर हल्लाही झाला. त्यांना जशास-तसे उत्तर देण्याच्या उद्देशाने प्रबळ उमेदवार म्हणून बबनराव घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. घोलप यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता होती. त्यांनी शिवसेनेतील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालत प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. शनिवारी (22 मार्च) ते शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे यांनी तयारीही पूर्ण केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली व शिवसेनेला शिर्डी मतदारसंघात वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतरचा दुसरा धक्का बसला. या अनपेक्षित धक्क्याने शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत. ऐनवेळी आलेल्या या निकालामागे सत्ताधारी असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये असून आणखी त्वेषाने प्रचारात उतरण्याचा निर्धार शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
प्रतिष्ठा पणाला लावू
न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असताना ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर घोलप यांच्या विरुद्ध निकाल गेल्याने यामागे षडयंत्र असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. सत्ताधार्‍यांनी आखलेल्या या षडयंत्रामुळे शिवसैनिक आणखी त्वेषाने कामाला लागतील. गावागावात जाऊन प्रचार करत आहोत. कोणताही उमेदवार दिला, तरी जबाबदारी प्रतिष्ठा पणाला लावून पार पाडू.’’ प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
वेळीच का नाही सुचले ?
शिवसेनेने सुरुवातीला घोलप यांना उमेदवारी द्यायला नको होती. उमेदवारी दिल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वत: शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्घव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. निदर्शनास आणून देऊनही चूक दुरुस्त करण्यात आली नाही. शिवसेनेने स्वत:हून याप्रकरणी नामुष्की ओढवून घेतली आहे.’’ अँड. श्याम आसावा, पदाधिकारी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन.