आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, ,Latest News In Divya Marathi

गांधी-राजळेंना बसेल अंतर्गत वादाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी गुरुवारी (17 एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतदानानंतर ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य तसेच काही पदाधिकार्‍यांशी चर्चा केली, असता अंतर्गत कलहाचा फटका गांधी आणि राजळेंना बसणार असल्याचे सांगितले.
निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले प्रताप ढाकणे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, तर राष्ट्रवादीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरणारे आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रेष्ठींच्या आदेशानुसार राजळेंच्या उमेदवारीचा स्वीकार केला.
या घडामोडीत भाजप व राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. जिल्हा परिषदेत काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादीसोबत काम करणार्‍या काँग्रेसच्या सदस्यांना जिल्हा परिषदेत मात्र, विरोधात बसावे लागले. लोकसभेला काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिल्याने या सदस्यांना श्रेष्ठींकडून आघाडीधर्म पाळण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार सदस्यांनी कामही सुरू केले होते, पण अंतर्गत मतभेद दोन्ही उमेदवारांसाठी अडचणीचे ठरले आहेत. गुरुवारी लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी मतदान झाले. राजळे यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली होती.
त्या तुलनेत गांधींची प्रचार यंत्रणा काहीशी ढिसाळ असल्याचे दिसून आले. मात्र, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर वातावरण बदलल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र, अंतर्गत कलहाचा फटका गांधी आणि राजळेंना बसणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य तसेच काही पदाधिकार्‍यांनी सांगितले.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर घुलेंनी दिलेली साथ राजळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याने राजळेंना शेवगाव-पाथर्डीत मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. गांधींना मोदी लाटेचा फायदा होऊन त्यांना नगरमधून मताधिक्य मिळेल, असा अंदाज आहे. राहुरीतूनही गांधी व राजळेंना चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड या तालुक्यात दोन्ही उमेदवारांत चुरस तीव्र आहे. अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे यांना वाढता पाठिंबाही नाकारता येत नाही. अंतर्गत वादाची किनार असलेल्या या निवडणुकीत एकूणच संमिर्श प्रतिक्रिया आल्याने कोण बाजी मारणार हे निकालानंतर कळेल.