आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्यात झाले गेले ते आता गंगेला मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीत महायुतीचा धर्म विसरून शिवसेना-भाजपने रिपाइंला ठेंगा दाखवला होता. त्यामुळे रिपाइंनेही मनपा स्वबळावर निवडणूक लढवली. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये रिपाइं शिवसेना-भाजपला मदत करणार का? याबाबत शंकाच होती. पण गुरुवारच्या मेळाव्यात शिवसेना-भाजप आणि रिपाइं एकत्र असल्याचे चित्र दिसले. यापूर्वी ‘झाले गेले ते गंगेला मिळाले,’ असा सूर आळवत महायुती पुन्हा एकत्र आल्याचे सांगण्यात आले.
डिसेंबर महिन्यात झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंने शिवसेना व भाजपकडे 12 जागांची मागणी केली होती. परंतु या मागणीला शिवसेना-भाजपने ठेंगा दाखवत आपल्याच उमेदवारांना जागावाटप केले. एवढेच नाही, तर रिपाइंला जागावाटपाच्या चर्चेलासुद्धा बोलावले नाही. त्यामुळे शिवसेना व भाजपला धडा शिकवण्यासाठी रिपब्लिकन पक्षानेही 6 जागांवर मनपा निवडणूक लढवली. या उमेदवारांचा प्रचारही रिपाइंने स्वबळावर केला होता. नगरमध्ये महायुतीला तडा गेल्याची बाब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कानावरही गेली होती. ज्या जागांची मागणी रिपाइंने युतीकडे केली होती, त्या जागांवर उघडपणे अपक्ष उमेदवारांना मदत करण्याची जाहीर भूमिका घेतली. महापालिका निवडणुकीत प्रभाग 5 अ, प्रभाग 7 अ, प्रभाग 14 अ व ब, प्रभाग 28 अ आणि प्रभाग 34 अ या सहा जागांवर रिपाइंने स्वबळावर निवडणूक लढवली. या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्हा संपर्कप्रमुख र्शीकांत भालेराव, युवक प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी स्टार प्रचारक म्हणून काम पाहिले. स्वबळावर लढवूनही रिपब्लिकन पक्षाला काहीच उपयोग झाला नाही. कारण महापालिका निवडणुकीत रिपाइंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. याबाबत आत्मचिंतन केल्यानंतर नगर शहरात रिपाइंची ताकद कमी असल्याचे पक्षर्शेष्ठींच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रिपाइं नगरमध्ये काय भूमिका घेणार याबाबतच्या शंकेला पूर्णविराम मिळाला. गुरुवारच्या सभेत रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीने युती एकत्र असल्याचे अधोरेखित झाले आहे.
रिपाइंला शहरात पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज
महापालिका निवडणुकीत रिपाइंची खरी ताकद दिसून आली. स्वबळावर जागा लढवूनही रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत. त्यामुळे शहरात रिपाइंला पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज आहे, हे लक्षात आले. आता याचे खापर मित्रपक्षांवर फोडण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची अधिक गरज आहे. शिवाय रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुती एकत्र असल्याचे सांगितले. त्यामुळे झाले गेले विसरून आम्ही एकत्र आहोत, असे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख र्शीकांत भालेराव यांनी महायुतीच्या मेळाव्यानंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.