आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, BJP, Dilip Gandhi, Shiv Sena, Divya Marathi

जास्तीत जास्त मतदान घडवण्यासाठी ‘फिल्डिंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी थांबला. आता जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी विविध पक्ष व त्यांच्या उमेदवारांचे नियोजन सुरू झाले आहे. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन साकडे घालण्यास प्रारंभ केला आहे.


जिल्ह्यात महायुतीकडून भाजपचे दिलीप गांधी, शिवसेनेचे सदाशिव लोखंडे, आघाडीकडून राष्ट्रवादीचे राजीव राजळे, काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे, आम आदमी पक्षाकडून दीपाली सय्यद, तर तिस-या आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे निवडणूक रिंगणात आहेत. इतरही अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. प्रमुख उमेदवारांनी मोठी प्रचार यंत्रणा उभी करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आर. आर. पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. सर्व पक्षांनी आपली भूमिका मांडत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडत काम करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. प्रचारफे-यांमुळे गेले काही दिवस वातावरण ढवळून निघाले होते.
17 एप्रिलला जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर सार्वजनिक सभा, मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता वाहनांची व्यवस्था करण्यास आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांच्या खास कार्यकर्त्यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आचारसंहिता असल्याने गोपनीय पद्धतीने हे काम रात्रीपासून सुरू झाले आहे.


कसा होतो छुपा प्रचार
नगर लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने गावपातळीवरील स्थानिक कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबंधित कार्यकर्ता गावातील लहान-मोठे युवकांचे गट, बचत गट, तसेच प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी घेतो. जास्तीत जास्त मतदान घडवण्यासाठी मतदारयादीत नाव असल्याच्या चिठ्ठ्यावाटपाची लगीनघाई सुरू आहे. मतदानापूर्वीच्या दोन रात्री जीवाचे रान करून छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे सध्या जिल्ह्यात अजमावले जात आहेत.