आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi, New Voters, India

यादीत नाव नसल्याने अनेक युवक नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अनेक नवमतदार युवकांची नावे यादीत नसल्याने त्यांना गुरुवारी मतदानापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांचे छायाचित्र बदलले गेले, तर काही नावांच्या चिठ्ठय़ांवर छायाचित्रच नव्हते. त्यामुळे शहरात अनेक मतदान केंद्रांवर किरकोळ गोंधळ निर्माण झाला.


लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सातपासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली. नुकतीच अठरा वर्षे पूर्ण झाल्याने मतदान करण्यासाठी उत्साहाने आलेल्या अनेक युवकांना मात्र यादीत नाव नसल्याने परत जावे लागले. यादीत नाव नाही, पण मतदार चिठ्ठी आहे, असेही काही मतदार होते. प्रशासकीय यंत्रणेच्या गोंधळामुळे अनेकजण नाराज झाले.


नगर शहर मतदारसंघातील अर्चना देवळालीकर यांना घरपोहोच आलेल्या ओळख पावतीवर त्यांचे नाव आहे, पण छायाचित्र भलत्याचे होते. सावेडी येथील वाणीनगर भागातील संजय डहाळे यांच्या मतदान चिठ्ठीवर त्यांचे छायाचित्र नव्हते. वास्तविक ही चिठ्ठी मतदान केंद्रावर घेऊन जाणे बंधनकारक नाही. मतदारांचा तपशील अथवा छायाचित्र चुकीचे असल्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पर्यायी दस्तऐवजांच्या आधारे मतदान करण्यास परवानगी आहे. मात्र, अनेक मतदारांकडे चुकीचा तपशील असलेल्या मतदार चिठ्ठय़ा असल्याने त्यांनी इतर ओळखीचा पुरावा बरोबर नेला नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली. चिठ्ठय़ा पोहोच न झाल्याने अनेक मतदारांना त्यांचा बूथ क्रमांक माहिती नव्हता. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा किरकोळ कारणावरून मतदार संभ्रमात होते. मात्र, अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.


कर्जतमध्ये नवमतदारांत उत्साह
नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी गर्दी केली होती. मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या विकास म्हस्के याने गावात येऊन प्रथमच मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली. कुठेही रांगेत उभे राहण्याची वेळ मतदारांवर आली नाही. कर्जत, मिरजगाव व राशीन या मोठय़ा गावांत मतदान केंद्रांची माहिती घेण्यातच अनेकांचा वेळ गेला. मिरजगाव येथे जिल्हा परिषद शाळा, नूतन विद्यालय, भारत विद्यालय या केंद्रांवर मतदान झाले. यादीत नाव सापडत नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. पंचायत समितीच्या सभापती सोनाली बोराटे, राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, बाळासाहेब साळुंके, परमवीर पांडुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.


मतदानापासून वंचित
मी 22 वर्षांचा असून मुकुंदनगर येथील रहिवासी आहे. प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार होतो. नियमानुसार नावनोंदणीचा अर्ज भरूनही प्रत्यक्ष मतदारयादीत माझे नाव आले नाही. माझ्यासारख्या अनेक तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.’’ साजिद शेख, मुकुंदनगर.


मतदारांना आल्या अडचणी
नाव स्त्रीचे आणि फोटो पुरुषाचा, अनेक पावत्यांवर फोटोच नाहीत, काही भागात घरपोहोच चिठ्ठय़ा आल्याच नाहीत. पावत्या न आल्याने अनेकांना बूथचे ठिकाण माहिती नव्हते. दोन महिन्यांपूर्वी याद्यांच्या दुरुस्त्यांसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र, दुरुस्ती न झाल्याने अडचण आली.’’ अर्चना देवळालीकर, राष्ट्रवादी, महिला आघाडी.