आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, , Nagar And Shirdi Lok Sabha Constituncy

शेवटचा दिवस कसोटीचा..आघाडीचा रोड शो, तर महायुतीची मोटारसायकल रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आघाडीच्या प्रचारासाठी माळीवाडा वेशीपासून नवनीत राणा यांनी ‘रोड शो’ केला. छाया : कल्पक हतवळणे - Divya Marathi
आघाडीच्या प्रचारासाठी माळीवाडा वेशीपासून नवनीत राणा यांनी ‘रोड शो’ केला. छाया : कल्पक हतवळणे

नगर - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांतील जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नगर शहरात आघाडीने ‘रोड शो’ केला, तर महायुतीने मोटारसायकल रॅली काढून मतदारांना साकडे घातले. तिसर्‍या आघाडीचे उमेदवार बी. जी. कोळसे यांनी राहुरी येथे प्रचारसभा घेतली.


जाहीर प्रचार संपला असला, तरी शेवटचा एक दिवस उमेदवारांसाठी कसोटीचा ठरणार आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य गुरूवारी (17 एप्रिल) मतदान यंत्रांत बंद होणार आहे. लढत चुरशीची असल्याने पारडे कोणाकडे झुकते, याचे अंदाज बांधले जात आहेत.


नगरमध्ये 13, तर शिर्डीत 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आघाडीच्या वतीने अभिनेत्री नवनीत राणा यांच्या उपस्थितीत सकाळी नगर शहरात रोड शो करण्यात आला. यावेळी राणा यांचे पती रवी राणा, महापौर संग्राम जगताप, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आदी उपस्थित होते. रोड शोमध्ये आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नवनीत कौर यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शहराच्या प्रमुख मार्गावरून आल्यानंतर दिल्लीगेट येथे रोड शोचा समारोप झाला.
भारतीय जनता पक्षातर्फे सकाळी खासदारपुत्र सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मध्यवर्ती शहरासह केडगाव, सावेडी, भिंगार आदी ठिकाणी ही रॅली फिरवण्यात आली. रॅलीत सुमारे दीडशे बाइकस्वार सहभागी झाले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांच्या हस्ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरूवात झाली.


आम आदमी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शहरातील विविध भागात फिरून प्रचार केला. तिसर्‍या आघाडीचे उमेदवार बी. जी. कोळसे यांनी राहुरी येथे शेवटची प्रचारसभा घेतली. आघाडीचे राजळे व भाजपचे गांधी यांनी ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे होणारी सभा रद्द झाली.


शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. जाहीर प्रचार संपला असला, तरी प्रत्यक्ष मतदानाला अजून एक दिवस शिल्लक आहे. या दिवशी छुपा प्रचार व फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याने उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.


स्टार प्रचारकांच्या सभांमुळे दोन्ही मतदारसंघांतील वातावरण ढवळून निघाले आहे. आता निर्णय मतदारांच्या हातात आहे. गुरूवारी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदार यंत्रांत बंद होणार असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.


आजची रात्र वैर्‍याची
जाहीर प्रचार संपल्याने उमेदवारांसाठी आजची रात्र वैर्‍याची ठरणार आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्यात येऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


सोशल मीडियावर रंगणार प्रचार
काही पक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरू ठेवण्यात आला आहे. नगर मतदारसंघातील आघाडीचे राजळे व महायुतीचे गांधी यांच्या सर्मथकांत दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचारयुध्द सुरू आहे. मात्र, या प्रचाराने हीन पातळी गाठली आहे.