आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nagar And Shirdi Lok Sabha Constituncy

नगर, शिर्डीत सरासरी 60 टक्के मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुरूवारी (17 एप्रिल) शांततेत सुमारे साठ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा ही टक्केवारी नऊने जास्त आहे. मात्र, नगर शहरातील मतदारांमध्ये निरुत्साह होता. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी बारानंतर तर काही मतदान केंद्रे ओस पडली होती. सायंकाळी पाचनंतर मतदानात काही प्रमाणात वाढ झाली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान उत्साहात सुरू होते. दोन्ही मतदारसंघांतील 27 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला 16 मे रोजी होणार आहे.


नगर लोकसभा मतदारसंघातील 13 व शिर्डी मतदारसंघातील 14 अशा एकूण 27 उमेदवारांचे भवितव्य गुरूवारी मतदानयंत्रांत बंद झाले. मतदान प्रक्रियेसाठी वीस हजार कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जिल्ह्यातील 3 हजार 581 मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदानाला सुरूवात झाली. त्याआधी सकाळी सहा वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची चाचणी घेण्यात आली.


मतदानासाठी सरकारने सार्वत्रिक सुटी जाहीर केली होती. एमआयडीसीतील कामगारांनाही मतदानासाठी सुटी देण्यात आली होती. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, निवडणूक प्रक्रियेत असलेल्या अनेक कर्मचार्‍यांना निवडणूक पत्रिका वेळेवर न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. संगमनेर 1, शिर्डी 1, कोपरगाव 1, श्रीरामपूर 3, नेवासे 1, पारनेर 2, कर्जत 1 व श्रीगोंदे 1 या विधानसभा मतदारसंघातील 11 मतदान यंत्रामध्ये काही काळ बिघाड झाला होता.
नगर लोकसभा मतदारसंघात राजीव राजळे (राष्ट्रवादी), दिलीप गांधी (भाजप), दीपाली सय्यद (आम आदमी पार्टी), बी. जी. कोळसे (अपक्ष), किसन काकडे (बहुजन समाज पार्टी), अजय बारस्कर (बहुजन मुक्ती पार्टी), शिवाजी डमाळे (भारतीय नवजवान सेना), पोपट फुले (महाराष्ट्र परिवर्तन सेना), अनिल घनवट (अपक्ष), पेत्रस गवारे (अपक्ष), विकास देशमुख (अपक्ष), लक्ष्मण सोनाळे (अपक्ष) व श्रीधर दरकेर (अपक्ष) असे 13 उमेदवार रिंगणात आहेत.


शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस), सदाशिव लोखंडे (शिवसेना), नितीन उदमले ( आम आदमी पार्टी), महेंद्र शिंदे (बहुजन समाज पार्टी), विजय बंडेराव (द लोकपाल ऑफ इंडिया), रघुनाथ मकासरे (भारिप बहुजन महासंघ), पोपट सरोदे (लोकभारती), संतोष रोहम (बहुजन मुक्ती पार्टी), उध्दव गायकवाड (अपक्ष), बाळू बागुल (अपक्ष), गंगाधर वाघ (अपक्ष), रवींद्र शेंडे (अपक्ष), सयाजी खरात (अपक्ष) व संदीप घोलप (अपक्ष) हे 14 उमेदवार रिंगणात आहेत.
तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
नगर लोकसभा मतदारसंघात 50 तृतीयपंथीयांनी संघटनेच्या अध्यक्ष काजल गुरू यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा आपला हक्क बजावला. सर्मथ विद्यामंदिर व सेंट हायस्कूल येथे त्यांनी मतदान केले. हा हक्क मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


खासदार, आमदारांसह मंत्र्यांनी केले मतदान
नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते यांनीही मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला.


* शिर्डीतील मतदान
विधानसभा मतदारसंघ टक्केवारी
0 अकोले 49.66
0 संगमनेर 59.53
0 शिर्डी 42.37
0 कोपरगाव 60.14
0 श्रीरामपूर 60.69
0 नेवासे 42.80


* नगरमधील मतदान
विधानसभा मतदारसंघ टक्केवारी
0नगर शहर 46.53
0शेवगाव -पाथर्डी 49.00
0कर्जत-जामखेड 57.13
0राहुरी 56.16
0 श्रीगोंदे 51.50
0 पारनेर 49.78


नऊ टक्क्यांनी वाढले यावेळी मतदान
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगली वाढली आहे. गेल्यावेळी 51 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढीव मते कोणाच्या पारड्यात पडतात, हे पहायचे.


शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मतदानकेंद्राच्या 100 मीटरच्या आत प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्यासह प्रवीण जाधव व पवन जाधव यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.’’ रावसाहेब शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक


पारनेरचे नायब तहसीलदार निलंबित
निवडणूक कामात हलगर्जी केल्याप्रकरणी पारनेर येथील नायब तहसीलदार रमेश वाळके यांना निलंबित करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात कोठेही बोगस मतदानाचा प्रकार झाला नाही. ’’ अनिल कवडे, जिल्हाधिकारी