आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nagar Municipal Corporation, Divya Marathi

उपनगरांमध्ये प्रचाराकडे उमेदवारांचे झाले दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. नगर मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ग्रामीण भागातील प्रचारावरच भर दिला आहे. महापालिका हद्दीतील मध्यवर्ती शहरात प्रचारफेर्‍यांना वेग आला असला, तरी केडगाव, मुकुंदनगर व नागापूर-बोल्हेगावमधील प्रचाराकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मतदारांची मोठी संख्या असूनही या भागातील प्रचाराला अजून रंगत आलेली दिसत नाही.
महापालिकेची स्थापना होऊन दहा वर्षे उलटली. नगर शहराच्या आजूबाजूच्या 12 गावांचा समावेश करून मनपाची स्थापना करण्यात आली, परंतु ही गावे (आताची उपनगरे) अजूनही विकासापासून दूर आहेत. एरवी उपनगरांच्या विकासाकडे दुर्लक्ष करणारे राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी लोकसभा निवडणूक प्रचारातही या गावांकडे दुर्लक्ष केले आहे. नगर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. परंतु त्यापैकी एकाही उमेदवाराने उपनगरांतील प्रचाराकडे लक्ष दिलेले नाही. केडगाव, मुकुंदनगर व नागापूर-बोल्हेगावमधील लोकसंख्या दीड लाखापेक्षा अधिक आहे. त्यात मतदारांची संख्यादेखील लाखाच्या घरात आहे. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत उपनगरांमध्ये प्रचाराची मोठी धूम होती, परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र या भागातील प्रचाराला अजूनही रंगत आलेली नाही. एकीकडे मध्यवर्ती शहरात दररोज प्रचारफेर्‍यांचे आयोजन करण्यात येत आहे, तर दुसरीकडे उपनगरांमध्ये अजूनही कोणत्याही पक्षाने मोठी प्रचारफेरी काढलेली नाही. त्यामुळे उपनगरांमधील स्थानिक नगरसेवक निश्चिंत आहेत. मनपा निवडणुकीत केडगाव उपनगरातील प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या काँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर राष्ट्रवादीच्या बरोबरीने आघाडीच्या उमेदवाराचा शहरात प्रचार करत आहेत. परंतु त्यांनी स्वत:चा बालेकिल्ला असलेल्या केडगावात अजून एकही मोठी प्रचारफेरी काढलेली नाही.
मुकुंदनगर उपनगरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील प्रचाराबाबत प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी देखील कोणत्याच उमेदवाराने प्रचाराला वेग दिलेला नाही. नागापूर-बोल्हेगाव उपनगरातील परिस्थिती देखील अशीच आहे. प्रचारासाठी आता शेवटचे सहा दिवस उरले आहेत. सध्या तरी सर्वच उपनगरांमधील प्रचार थंड आहे. शेवटच्या सहा दिवसांत सर्व उमेदवारांना येथील प्रचाराला वेग द्यावा लागणार आहे.
प्रचारफेर्‍यांचे नियोजन नसल्याने नगरसेवक अडचणीत
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने प्रत्येक नगरसेवकाकडे प्रभागनिहाय प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. त्यात उपनगरांमधील नगरसेवकांचाही समावेश आहे. परंतु उपनगरांमध्ये प्रचारफेर्‍यांचे आयोजन नसल्याने या नगरसेवकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रचार कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मनपा व लोकसभा निवडणूक प्रचारात मोठा फरक असल्याने नगरसेवकांची काळजी वाढली आहे.
वाहनांद्वारे होतोय प्रचार
आघाडीचे उमेदवार राजीव राजळे व महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी प्रचारात वाहनांचा मोठय़ा प्रमाणात वापर करत आहेत. वाहनावर फलक, तसेच लाऊडस्पिकर लावून आपण केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. मध्यवर्ती शहराप्रमाणेच उपनगरांमध्येदेखील ही वाहने फिरत आहेत. उपगरांमध्ये ही वाहने सोडली, तर प्रचाराची फारशी धामधूम दिसून येत नाही.