आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Vote Counting, Divya Marathi, Nagar

लो‍कसभा निवडणुकीचा आखाडा: मतमोजणी प्रक्रियेचे होणार व्हिडिओ शूटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 16 मे रोजी होणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीचे व्हिडिओ शूटिंग होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिवारी (3 मे) दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष पदाधिकारी व उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली होती त्यात ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, निवडणूक उपजिल्हा अधिकारी सुनील माळी यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कवडे म्हणाले, बारा विधानसभा मतदारसंघनिहाय ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक सहायक, सूक्ष्म निरीक्षक व शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय पडणा-या मतांची नोंद फॉर्म 17 वर करण्यात येईल. टेबलनिहाय पडणा-या मतांची बेरीज करून फेरीचा निकाल जाहीर करण्यात येईल. फेरीनिहाय उमेदवारांना पडणारी मते फलकावर लावण्यात येईल. प्रत्येक उमेदवाराला टेबलनिहाय एक मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल. मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करताना ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल नाही, त्यांनाच प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येतील.

मतमोजणीसाठी 1200 कर्मचारी व अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी 3 हजार 581 मतदान यंत्रे मागवण्यात आली होती. 17 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे एमआयडीसीतील वखार महामंडळात ठेवण्यात आली आहेत.

धाकधूक वाढली
नगरमधील 13, तर शिर्डी मतदारसंघातील 14 अशा 27 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला 16 मे रोजी होणार आहे. जसजशी मतमोजणीची तारीख जवळ येत आहे तसतशी उमेदवार व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत चालली आहे. नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राजीव राजळे, महायुतीकडून दिलीप गांधी यांच्यात प्रमुख लढत झाली. शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात प्रमुख लढत झाली. जय-पराजयाची सध्या चर्चा सुरू आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाइलवर बंदी
मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तसेच या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मतमोजणी मोजणी अधिकारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मोबाइल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

दीड वाजेपर्यंत निकाल
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील. मतमोजणी ही इन कॅमेरा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रात दोन व मतमोजणी केंद्राबाहेर एक कॅमेरा असणार आहे तसेच मतमोजणी केंद्राच्या 100 मीटरपर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.