आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीची सभा ‘गारपीट’ केंद्रित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी आयोजित जाहीर सभा केवळ ‘गारपीट’ केंद्रित ठरली. महायुतीवर टीकास्त्र सोडत गारपीटग्रस्त भागाला आघाडी सरकारने कशी मदत दिली, याचे रसभरीत वर्णन वक्त्यांनी करून स्थिर सरकारसाठी आघाडीलाच साथ द्या, अशी साद घातली.
राजळे व वाकचौरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. नंतर दिल्ली दरवाजाबाहेर दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व मधुकर पिचड, आमदार चंद्रशेखर घुले, बबनराव पाचपुते, अंकुश काकडे, घनश्याम शेलार, जयंत ससाणे, यशवंतराव गडाख, सोमनाथ धूत, महापौर संग्राम जगताप, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, सरकारने काल मोठा निर्णय घेऊन गारपीटग्रस्तांना दिलासा दिला. मी इंदापूरला डाळिंबबागेच्या पाहणीसाठी गेले होते. तेथील शेतकर्‍यांशी चर्चा करत असताना एका माऊलीच्या रडण्याचा आवाज आला. मी त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले सारे काही आनंदात होते, पण गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. घरातील कर्ता माणूस गेल्यासारखे वाटायला लागले.
एका दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी राज्याच्या दौर्‍यावर आले होते. पंढरपूरला झालेल्या सभेत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केंद्राकडे दोन हजार कोटींची मदत मागितली, पण मिळाले अवघे पन्नास कोटी. आता शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मदत मागिल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चार हजार कोटी दिले. आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही. हा पहिलाच जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात आघाडीचे मनोमीलन चांगल्या पद्धतीने झाल्याचे दिसते, असे खासदार सुळे यांनी सांगितले. मंत्री विखे, थोरात यांनीही आपल्या भाषणात गारपीटग्रस्तांसाठी सरकारने केलेल्या मदतीचा दाखला दिला. अन्य मुद्यांना कोणीच फारसा स्पर्श केला नाही