आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान आटोपले तरी लढाई नाही संपली..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाच मार्चला जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम गुरुवारच्या मतदानानंतर शमली. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी आता थंडावली आहे. निकालाला आता महिनाभर अवकाश आहे. या कालावधीत निवडणुकीत नशीब अजमावलेले उमेदवार आराम करतील, असे कोणाला वाटत असेल, तर तो गैरसमज आहे. मतदान झाले असले, तरी आपली लढाई संपलेली नाही. निकाल काहीही लागो, आपली लढाई सुरूच राहणार आहे, असे उमेदवारांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले म्हणाले, शिर्डी मतदारसंघात मी प्रमुख विरोधी नेता म्हणून कार्यरत राहिलो. निवडणूक काळात मी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलो. निवडणुकीत विजयी झालो, तर तो जनतेचा विजय असेल. पराभूत झालो, तरी प्रमुख विरोधी नेता म्हणून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास टाकणार्‍या सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासाला मी अखेरपर्यंत जागणार, हे निश्चित. येत्या महिन्याभरात आराम करण्याचा प्रश्नच नाही. उद्या मी मुंबईला रवाना होत असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या प्रचारात मी सक्रिय होणार आहे. तद्नंतर वाराणसीला पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारासाठी जाणार आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या (परिवर्तन) आघाडीचे उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनीही अशीच भूमिका मांडली. ते म्हणाले, मला कामाशिवाय जमतच नाही. मतदान संपले असले, तरी आज सकाळपासून माझे चळवळीचे काम पुन्हा नव्या जोमाने सुरू केले आहे. सकाळी सकाळी आईच्या दर्शनासाठी गेलो. नंतर मित्रांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे काही गोष्टींचा अनुभव आला. समविचारी संघटनांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी माझे चळवळीचे काम तितक्याच जोमाने सुरू राहणार आहे. उद्या मी धुळ्याला रवाना होत आहे. तेथे लोकशासन पक्षाचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहे. त्यांच्या प्रचारात मी सहभागी होत आहे, अशी प्रतिक्रिया कोळसे यांनी सांगितले.