आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती करा मातीचे, रक्षण होईल पर्यावरणाचे...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोणताही सण संस्कृतीच्या पावित्र्याचे प्रतीक असतो. गणेशोत्सवही तसाच. विघ्नहर्त्याचे दहा दिवस पूजन करून त्याच्याकडे बुद्धीचे वरदान मागायचे व एका मंगलमय सोहळ्यात दहा दिवस रंगून जायचे, ही आपली परंपरा. पण उत्सव सार्वजनिक झाला की, त्यात काही अनिष्ट प्रवृत्ती घुसतातच. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, पण ज्यांना आपण मंगलमूर्ती म्हणून दहा दिवस पूजतो, त्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची नंतर होणारी विटंबना या उत्सवाचे पावित्र्य व मांगल्य नष्ट करणारी असते. वास्तविक पाहता अडीच फुटांच्या आतील मूर्ती शाडूच्या मातीची असावी, असा अनेक राज्यांमध्ये सरकारी अध्यादेश आहे. तो महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे.

प्रसिद्ध शिल्‍पकार प्रमोद कांबळे यांनी हा उत्सव मंगलमय करण्याचे व्रत स्वीकारले आहे. शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार करून तिची पूजा करण्याची चळवळ ते १७ वर्षांपासून राबवत आहेत. रवविारी (२४ ऑगस्ट) त्यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत अडीच हजार लहान-थोरांनी सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणासाठी आपला दृढनिश्चय दाखवून दिला. या चळवळीबाबत कांबळे यांच्याशी केलेली बातचित : -
आपल्याला ही कल्पना कशी सूचली?
ही घटना १९९७ मधील आहे. मी आमच्या स्टुडिओकडे दुचाकीवरून जात असताना प्रोफेसर कॉलनीजवळच्या ओढ्यातील गाळ उपसलेला दिसला. त्यात चपला, टायर व टाकाऊ वस्तूंबरोबरच गणपतीच्या भंगलेल्या अनेक मूर्ती होत्या. दहा दिवस ज्या देवतेची आपण पूजा करतो, तिची अशी विटंबना पाहून मला खूप दु:ख झाले. त्या सर्व मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसच्या होत्या. त्या पूर्णपणे विरघळून जात नाहीत. त्या मातीच्या असत्या, तर लगेच पूर्ण विरघळून त्यांची माती झाली असती. त्या रंगवण्यासाठी जे रंग वापरले जातात, तेही रासायनिक व घातक असतात. याबद्दल माझी मित्राशी चर्चा झाली. खरेतर हाताने मातीची गणेशमूर्ती बनवून तिची दहा दिवस पूजा करण्याची आमच्या घराण्याचीच परंपरा आहे. ती आजोबांपासून आहे. गणेश चतुर्थीच्या दविशी वडील दत्तात्रेय मातीच्या गोळ्याची पूजा करून मूर्ती बनवायचे. तलिा रंगवून तिची पूजा केली जायची. मी व माझे तीन भाऊ लहानपणापासूनच हे पाहत व मूर्ती बनवत आलो. मुळात पार्वतीने गणेशाची निर्मिती मातीपासूनच (उटणे व विशिष्ट प्रकारच्या लेपासाठीची माती) केली होती. त्यामुळे मूर्ती मातीचीच असली पाहिजे, तरच या पूजेला अर्थ आहे, असे वडील म्हणत. आपण स्वत: घरात मातीची मूर्ती बनवतो, तर इतरांनाही तसे करण्यास का प्रवृत्त करू नये, असा विचार मनात आला.
पहिली कार्यशाळा कधी घेतली?
मातीपासून गणेशमूर्ती कशी बनवायची, याच्या कार्यशाळा घेण्याचे मी ठरवले. त्यासाठी खूप मेहनत करून लहान मुलेही मूर्ती बनवू शकतील, असा अत्यंत सोपा व सहज कृती आराखडा तयार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिली कार्यशाळा नगरच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात घेतली. त्यावर्षी फक्त ३३ मुले होती. पुढील वर्षी मात्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर दरवर्षी वाढतच गेला. या उपक्रमात यावर्षी १५ हजारांहून अधिक गणेश मूर्ती तयार झाल्या. आतापर्यंत पुणे, नाशिक, मालेगाव, कोपरगाव, संगमनेर, इंदूर, भोपाळ, उटी व नगर शहरात दोनशेहून अधिक कार्यशाळा झाल्या. फक्त या वर्षी झालेल्या कार्यशाळांत २१ हजारांहून अधिक मूर्ती तयार झाल्या आहेत. १९९७ मध्ये रुजवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीच्या रोपट्याचे हळूहळू महावृक्षात रूपांतर झाले आहे. दरवर्षी मला देशभरातून अशा कार्यशाळांसाठी बोलावणे येते. कितीही कामात असलो, तरी त्यासाठी मी वेळ काढतोच.
कार्यशाळांचा अनुभव कसा असतो?
कार्यशाळेत नोंदणी झालेल्यांना शाडूच्या मातीचा गोळा देतो. त्यानंतर सहभागी झालेल्यांच्या हाताचा व्यायाम करवून घेतो. त्यानंतर मूर्ती बनवण्याची प्रत्येक पायरी समजून सांगत उपस्थितांकडून आकर्षक मूर्ती बनवून घेतो. मातीच्या गोळ्यापासून स्वत:च्या हाताने मूर्ती बनवताना नवनिर्मितीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकतो. आम्हालाही तोच अधिक भावतो. आतापर्यंत अशा कार्यशाळांतून शाडूच्या सुमारे पावणेदोन लाख मूर्ती तयार झाल्या आहेत. लहानपणापासून मुले मातीबरोबर काम करतील, तर त्यांच्यातून चांगले कलाकार तयार होतील, हाही एक उद्देश या कार्यशाळांचा असतो. आम्ही फक्त मातीच्या मूर्ती बनवण्याचेच प्रशिक्षण देत नाहीत, तर त्यानंतर ती कशी रंगवायची हेही सांगतो. अष्टगंध डिंकाच्या किंवा फेव्हिकॉलच्या पाण्यात मिसळून तो मूर्तीला द्या. पितांबरासाठी हळद, लाल पंचासाठी कुंकू, काळ्या रंगासाठी बुक्का वापरा अशा सूचना आम्ही देतो. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती तयार होते. ही मूर्ती विसर्जन करताना बादलीभर पाण्यात बुडवली, की पुन्हा तिची माती तयार होते. हीच माती परसबागेतील झाडाच्या आळ्यात टाकता येते. ही माती व निर्माल्यापासून चांगले खतही तयार होते. पर्यावरण रक्षण हेच आमच्या कार्यशाळांचे ध्येय आहे.
स्थानिक मातीपासून गणपती कसा बनवावा...
प्रत्येकाला शाडूची माती उपलब्ध होणे शक्य नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवर जी उपलब्ध आहे, त्या मातीपासूनही गणपती बनवणे सोपे आहे. त्याची कृतीही कांबळे यांनी सांगितली. ते म्हणाले, उपलब्ध असेल ती सुकी माती घ्यावी. त्यातील मोठे खडे फोडून घ्यावेत. ती चांगली चाळून मग वस्त्रगाळ करून घ्यावी. वस्त्रगाळ केलेली माती पाण्याने भिजवावी. एक किलो मातीच्या गोळ्यात एक चमचा साजूक तूप व पाच ग्रॅमची कापराची वडी (बारीक करून), पाच ग्रॅम कापूस (सुटा करून), चुन्याची नविळी व अष्टगंधाची एक वडी मिसळावी. हे सर्व मिश्रण ओल्या कापडात किंवा बारदान्यात दोन दिवस ठेवावे. या मिश्रणामुळे मातीला तडे जात नाहीत.
पुढील वर्षी अमेरिकेतही कार्यशाळा
कांबळे यांच्या शिबिरात अनेक वर्षे मूर्ती बनवण्यास शिकलेली नगरची मयुरा निसळ ही मुलगी लग्नानंतर अमेरिकेत गेली. गणेशोत्सवासाठी तिने स्वत:च मातीचा गणपती बनवला. त्यांच्या परिचयातील अमेरिकेतील भारतीयांना तो खूप आवडला. त्यांनी त्यांच्यासाठीही मूर्ती बनवण्याची तलिा गळ घातली. आता ती दरवर्षी शंभर मूर्ती बनवते. हे सर्व करताना ती सतत इंटरनेटद्वारे संपर्कात असते. आता अमेरिकेत कार्यशाळा घेण्यासाठी बोलावणे आले आहे. पुढील वर्षी तेथे कार्यशाळा घेणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
(१) शाडूच्या मातीचा अंदाजे दोन किलोंचा गोळा घ्यावा. (२) आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यातील २५ टक्के भाग हाताने तोडून वेगळा करावा. (३) आकृतीत दाखवल्याप्रमाणे मोठा ए व छोटा बी असे दोन भाग तयार होतील. त्यातील बीचे चार समान भाग तयार करावेत व ते बाजूला ठेवावेत. (४) उरलेला मोठा भाग एचा आकृतीत दाखवल्याप्रमाणे सहा इंच उंच, चार इंच लांब व तीन इंच रुंद असा विटेसासारखा आकार तयार करावा. (५) आकृतीत दाखवल्याप्रमाणे समोरील बाजूस उभ्या दोन व आडव्या दोन समान रेषा आखून त्याचे नऊ भाग होतील अशी आखणी करावी, तसेच त्याच्या बाजूच्या भागात मध्यभागी उभी एक रेष व समोरच्या भागाला जोडणारी आखून रचना करावी. (६) समोरील नऊ भागांपैकी क्रमांक एक व तीन आकृतीत दाखवल्याप्रमाणे काढून बाजूला करावेत. क्रमांक दोन तसेच ठेवावे.(७) एक व दोन भागातील काढलेल्या मातीपैकी क्रमांक एक या मातीचा आकृतीत दाखवल्याप्रमाणे गाजरासारखा आकार तयार करावा. (८) तयार झालेला गाजरासारखा आकार (डोके व सोंड) क्रमांक दोनवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लावावा व मागील मातीमध्ये तो एकजीव करावा. तसेच क्रमांक तीनचा गोळा गोल पेढ्याच्या आकाराचा करून क्रमांक आठच्या वरील भागात (पोटाचा आकार) लावून एकजीव करावा. (९) क्रमांक तीनमधील चार बाजूला काढलेल्या मातीच्या गोळ्यांपैकी दोन गोळे पायासाठी क्रमांक सात व क्रमांक नऊवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लावून मागील मातीत एकजीव करावेत.(१०) अंगठ्याच्या साहाय्याने क्रमांक एक व तीनची राहिलेली मागील बाजूची माती दाबून तिला कानासारखा आकार द्यावा. तसेच पुढे आपल्याला जमेल तसे गणेशाचे रूप साकारावे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, कशी तयार करता येईल गणेश मुर्ती